परभणी(प्रतिनिधी)वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ रिलायन्स फाउंडेशन परभणी अंतर्गत डिजिटल फार्म स्कुलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना सोयाबीन पीक कीड, रोग व खत व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. त्यात सध्या खरीप हंगामात, त्यातच परभणी जिल्यातील प्रमुख पिक म्हणून सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व शेतकऱ्यांना सोयाबीन पिक रोग व खत व्यवस्थापन कसे करायचे या संबंधी बरेच प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे निराकरण करण्याचा उद्देशाने रिलायंस फॉउंडेशन माहिती सेवा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी परभणी जिल्यातील दुरडी येथील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिकातील रोग व खत व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमामध्ये वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठातील डॉ. जी. डी. गडदे यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये सोयाबीन वरील लष्करी अळी, चक्रीभुंगा, मावा तुडतुडे, शेंगा पोखरणारी अळी इत्यादी विषयीचे व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना त्यांच्या थेट शेतामध्ये पिकाची पाहणी करून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये गावातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते, तसेच होतकरू शेतकरी संजय चोपडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मनोज काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामाजी राऊत यांनी प्रयत्न केले.