औरंगाबाद शहरातील राजनगर मुकुंदवाडी परिसरात बिबट्याने एका घरात झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली असून हल्ला झालेल्या व्यक्तीने प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्याने बिबट्याने पळ काढला. सविस्तर माहिती अशी की,मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या राजनगरात पहाटे दोन वाजता संजय शेजवळ यांच्या घरामध्ये बिबट्याने घुसून हल्ला चढवून उजव्या पायाचा पंजा पकडून बिबट्या ओढत असताना त्यांनी आरडाओरड करून जोरदार प्रतिकार केल्याने बिबट्या तेथून पाळला. तसेच बिबट्या पुन्हा याच भागात आल्यावर त्यावर धावून गेलेल्या दोन कुत्र्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडून एका कुत्र्याला मारून टाकलेले, तर दुसऱ्या कुत्र्याला आंधारात फरफटत नेले. या गोंधळामुळे परिसरातील तरुणांनी बिबट्याचा पाठलाग केला; परंतु तो सापडला नाही. अंधारात बिबट्या जंगलात गेला असावा किंवा अथवा पडक्या घरात दडून बसला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.संजय शेजवळ यांनी जखमी अवस्थेत घाटी रुग्णालय गाठले. त्यांच्या पायात चार दात खोलवर घुसले असून, गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.