परभणी(प्रतिनिधी)मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने रबी शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवारी (दि.17) दुपारी 2 वाजता कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले अज्ञसी. मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून माजी कुलगुरू डॉ.वेदप्रकाश पाटील आणि महिकोचे विश्वस्त डॉ.राजीव बारवाले हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे राहणार आहेत. मेळाव्यास खासदार श्रीमती फौजिया खान, खा.संजय जाधव, आ.सतिश चव्हाण, आ. बाबाजानी दुर्राणी, आ.विक्रम काळे, आ.विप्लव बाजोरिया, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपुरकर, आ.श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, आ.रत्नाकर गुट्टे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याप्रसंगी कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनाचा समावेश असलेल्या कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले असून तांत्रिक चर्चासत्रात रबी पीक लागवड, पिकांवरील कीड-रोग व्यवस्थापन आदींवर विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, लातूर विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर आणि औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक दिनकरराव जाधव यांनी केले आहे.