मुंबई, . राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असून यासंदर्भात जैवविविधता प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची बैठक आज सहयाद्री अतिथीगृह येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जैवविविधतेचे संवर्धन करणे हे अत्यंत आवश्यक असल्याने महाराष्ट्रातील सर्वांसाठी एक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येईल. या केंद्रामध्ये वर्षांतील 365 दिवस जैवविविधता जपण्यावर प्रशिक्षण देण्यात येईल. राज्य शासनातील विविध विभागात काम करणारे अधिकारी, विद्यार्थी, शेतकरी, कृषी तज्ञ यांच्यासह याविषयावर संशोधन करणाऱ्यांसाठी या केंद्राचा फायदा होईल.जैवविविधता विषयावर क्यूआर कॉफी टेबल बुक जैवविविधता म्हणजे नेमके काय, जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती आवश्यक आहे तसेच या क्षेत्रात तज्ञ लोकांनी केलेले काम लोकांसमोर आणण्यासाठी छोटेखानी क्यूआर कॉफी टेबल बुक तयार करण्याचे नियोजन करण्यात यावे. जैवविविधता मंडळाने एक स्वतंत्र ॲप तयार करुन राज्यातील सर्व ग्रमापंचायतीना यामध्ये जोडून घ्यावे. तसेच जिल्हा नियोजन समिती निधीमध्ये जैवविविधतेसाठी काही निधी देता येतो का याची माहिती घ्यावी. राज्य शासनामार्फत विविध विभागांमध्ये पदभरती करण्यात येणार असून वन विभाग आणि जैवविविधता मंडळाकडे आवश्यक पदभरती याबाबत माहिती त्वरित देण्यात यावी, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.