जिल्ह्यातील गोरगरीब रूग्णांना आरोग्यसेवेचा लाभ घेता यावा तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रियाही मोफत करता याव्यात यासाठी १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान लाईफ लाईन एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यात दाखल होणार आहे. या लाईफ लाईन एक्स्प्रेसचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
लाईफ लाईन एक्स्प्रेस ही हॉस्पिटल ट्रेन देशातील वेगवेगळ्या भागातून प्रवास करते. आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार ती वेगवेगळ्या स्टेशन्सवर थांबते आणि तिथल्या स्थानिक रुग्णांवर उपचार केले जातात. देशातील अनेक शहरांमध्ये गेल्यानंतर ही ट्रेन तिथे काही दिवस मुक्काम करते. या दरम्यान तिथल्या रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाते. एखाद्या आजारावर ट्रेनमध्ये उपचार होत नसेल तर जवळच्या मोठ्या रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान ही हॉस्पिटल ट्रेन स्थानिक प्रशासन आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करते.१५ सप्टेंबर पासून ही ट्रेन रायगड जिल्ह्यात दाखल होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व प्रा.आ.केंद्रानी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोतिबिंदू असणारे, कानांचे विकार असणारे, ऐकू येत नसणाऱ्या, ओठ, भाजलेले शरीर असणारे, पाय वाकडे असणे अशा प्रकारच्या सर्व रुग्णांचा शोध घेऊन वेळापत्रकानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेगाव व उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे संपर्क साधावा. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य सेविका, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना कार्यक्रमाची माहिती देऊन ती माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी. जेणेकरून नागरिकांना सदर सोईसुविधांचा लाभ घेता येईल, अशा सुचना डॉ. किरण पाटील यांनी केल्या आहेत.
...............
लाईफलाईन एक्स्प्रेस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे पुरविण्यात येणाऱ्या सेवा :
• डोळ्यांचे परिक्षण, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चश्मे वाटप
• कानांचे विकार असणाऱ्या रुग्णांचे परिक्षण व शस्त्रक्रिया
• वाकड्या पायांची तपासणी किंवा शस्त्रक्रिया (१४ वर्षाखालील)
• फाटलेले ओठ तसेच भाजलेल्या शरिरावरील परिक्षण व शस्त्रक्रिया
• स्त्रीरोग परिक्षण (स्तन व गर्भाशय, ग्रीव्हा, कॅन्सर परिक्षण )
• दातांचे परिक्षण व उपचार
...............