सोलापूर : शहरामध्ये सध्या मोकाट जनावरे, कुत्रे आणि गाढवांची संख्या वाढू लागली आहे. त्यांच्यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या महापालिकेकडून तक्रारी करूनही अंमलबजावणी होत नाही. यामुळे अशा मोकाट प्राण्यांचा शहरवासीयांना त्रास होऊ लागला असुन सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी परिसरात एका वनविभागाच्या अधिकाऱ्यालाच याचा अनुभव आला. त्यांना या कुत्र्यानं चावा घेतला असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, होम मैदान परिसरात वावरणाऱ्या लोकांनी सावध रहावे असा सल्ला दिला जात आहे.

सोलापुरात सगळीकडेच मोकाट कुत्र्यांची दहशत असुन वारंवार तक्रार करुनही महानगरपालिका प्रशासन याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्यात कमी पडत आहे. शासकीय कामाच्या निमित्ताने माळढोक पक्षी अभयारण्यात वनपाल असलेले गुरुदत्त दिलीप दाभाडे (वय३६, रा. राजस्व नगर, विजापूर रोड, सोलापूर) हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरत आले होते. आपले वाहन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार्किंग करून ते कोषागार कार्यालय मार्गे स्टेट बँकेकडे निघाले होते. त्यावेळी अचानक मागून आलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. दाभाडे यांनी छत्रीनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्याने अखेर डाव्या पायाला चावा घेतला. आजूबाजूच्या लोकांनी आपल्यालाही तो कुत्रा चावेल म्हणून दाभाडे यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर करण्यात आले. 

यावेळी बोलताना माळढोक अभयारण्य, नान्नज येथील वनपाल गुरुदत्त दाभाडे म्हणाले, मी उपचार घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात पोहोचलो. तेव्हा अन्य दोन व्यक्तीही कुत्रा चावल्यामुळे तेथे आल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व होम मैदान परिसरात पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याने चावल्याचे सांगितले. माझ्याकडे त्या कुत्र्याचा फोटो होता. जखमीना दाखवताच त्यांनी तो कुत्रा ओळखला. नागरीकांनी या परिसरात वावरताना दक्षता घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.