*जनावरांच्या लम्पी आजारावर मदत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा*

पैठण : राज्यात जनावरांमध्ये लम्पी व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दक्ष राहून गुरांमध्ये लम्पी विषाणूचा संसर्ग रोखण्याचे निर्देश दिले.जनावरांच्या लम्पी आजारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. एनडीआरएफच्या निकषानुसार लम्पी आजारावर मदत करण्यात येणार आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. औरंगबादमधील पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी लम्पी आजारावर एनडीआरफच्या निकषानुसार मदत करण्यात येईल अशी माहिती दिली. दरम्यान, १८००२३३०४१८ या टोल फ्री क्रमांकासोबतच राज्यस्तरीय कॉल सेंटरचा १९६२ हा टोल फ्री क्रमांक लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जळगाव, अहमदनगर, अकोला, धुळे, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लम्पी व्हायरसची प्रकरणे आढळून आली आहेत