शेतकरी आक्रमक : वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा; सेनगाव तहसीलदारांना निवेदन
सेनगाव – येथील वनपरिक्षेत्राच्या बाहेरील रानडुक्कर व रोही यांना सेनगाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले असून या रानडुक्कर व रोही यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सेनगाव येथील वनपरिक्षेत्राच्या बाहेरील रानडुक्कर व रोही यांनी उच्छाद मांडला आहे. सदरील वन्य प्राण्यांची संख्या सेनगाव परिसर व शेतशिवारात अगणित अशी झाली असून हे वन्यप्राणी शेती पिकाची नासाडी करत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास खर्च करून सुद्धा हिरावला जात आहे. तसेच रात्री अपरात्री शेताची राखण करणाऱ्या शेतकऱ्यांवर रानडुक्कर हल्ला करत आहेत.
सेनगाव तालुक्यात सात ते आठ शेतकऱ्यांवर रानडुकरांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे व शेती पिकाचे अतोनात नुकसान हे वन्य प्राणी करत आहेत.
यावर त्वरित संबंधित विभागाला कळवून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व शेतकरी उध्वस्त होण्यापासून वाचवावा, अशी मागणी करत लवकरात लवकर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला नाही तर शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.