केज :- मनरेगाच्या बाबतीत केज तालुक्यात वैक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीचे अनेक नमुने पहायला मिळत असून विहीर चोरीच्या घटना देखील चित्रपटात पहायला मिळत आहेत.
केज तालुक्यातील एका शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी खोदलेली विहीर गाव पुढारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून नवीन असल्याचे दाखवून शेतकरी आणि मजूर यांच्या परस्पर जिल्हा बँकेत त्यांचे खाते उघडून परस्पर उचलून अपहार केला असल्याची प्रकार उघडकीस आला आहे. या गैरप्रकाराची शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील शेतकरी विठ्ठल पटणे यांना सन २०११-१२ मध्ये त्यांच्या शेत जमीन सर्व्हे नंबर ३४/१ मध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली. सन २०१४ मध्ये त्यांनी मजुरामार्फत विहिरीचे खोदकाम सुरू केले आणि सन २०१५ मध्ये विहिरीचे पूर्ण खोदकाम पूर्ण झाले. या कामाचे त्यांना मजुरीपोटी मजुरांना १६ हजार ६२६ रु मिळाले. नंतर त्यानी मजुराकरवी ३० फूट व्यास व ४१ फूट खोलीच्या विहिरीचे खोदकाम पूर्ण केले. परंतु त्यांनी बिलाची मागणी करूनही तांत्रिक अडचणीमुळे व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र अपलोड केल्यामुळे बिल निघायला अडचणी आल्या. त्यांनी अनेक वेळा या बाबत वरिष्ठ कार्यालय आणि मंत्रालयातही पाठपुरावा सुरू ठेवला परंतु त्यात यश आले नाही. तसेच पंचायत समिती आणि जिल्हा नरेगा कक्षानेही सदर कामे अपूर्ण ऑनगोइंग मध्ये दाखवून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कार्यवाही केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
दरम्यान सन २०१६ मध्ये त्याच शेतकऱ्याच्या नावे पूर्वीची विहीर अस्तित्त्वात असतानाही नवीन वर्क कोड काढून २ लाख ७३ हजार ९०३ रु. हे मजुरांच्या खात्यावर वर्ग करून ते परस्पर उचलले असल्याची तक्रार विठ्ठल पटणे यांनी केली आहे. तसेच सदर विहिरीचे बांधकाम देखील केलेले नसतांना बांधकामासाठी खडी, सिमेंट, पाणी उपसा आणि क्रेन यासाठी १ लाख ३५ हजार ७३५ रु हे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगर सेवक, शाखा अभियंता व अधिकाऱ्यांनी संगनमत करून उचलून अपहार केल्याची तक्रार विठ्ठल पटणे यांनी केली आहे.
----------------------------------------------
माझ्या शेतातील दुसरी विहीर कोणी चोरली ? :- माझ्या शेतात एकच विहीर असताना दुसरी विहीर जर कागदोपत्री खोदली असेल तर ती विहिर मला शोधून द्यावी. नाही तर ती कोणी चोरली ? याचा तपास लावावा.
---- विठ्ठल पटणे, शेतकरी
--------------------------------------------
या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी सुनावणी घेण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्या नंतर कारवाई करण्यात येईल.
------ गवते,
तक्रार निवारण अधिकारी, मनरेगा बीड