परभणी(प्रतिनिधी)मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेला उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

आज शुक्रवारी (दि.९) परभणीतील भाग्यलक्ष्मी लॉन्स मध्ये उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक जिल्हाधिकारी आंचल गोयल, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मार्गदर्शक कोल्हापूर येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, तर सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य वित्त व लेखाधिकारी सचिन कवठे, प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, हवामान अभ्यासक पंजाब डख, कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, माजी सभापती अनिल नखाते, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्यासह सर्व उपशिक्षणाधिकारी, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 'कविता जगण्यात आहे' या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. नवोदय प्रवेश पात्र विद्यार्थी, एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, १० वी व १२ वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त, गुणवंत खेळाडू अशा जवळपास ३०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श शाळांना तसेच उत्कृष्ट जिल्हा शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्यासह शिक्षण विभागाने केले होते. यावेळी डॉ.नाईक अध्यात्मिक दृष्टांत देताना म्हणाले कि, शिक्षण पद्धती तेव्हा यशस्वी होऊ शकेल जेव्हा ती वारंवार आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम होईल. तसेच परभणीत स्थापन होत असलेल्या ऍस्ट्रॉनॉमिकल क्लब विषयी माहिती दिली.    

कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. लवटे म्हणाले कि, जिल्हा परिषद शाळांनी शिक्षणात सर्वात मोठी क्रांती घडवून आणली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट संकल्पना निर्माण कराव्यात जेणेकरून एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. शिक्षकांनी ज्ञान वृद्धीसाठी परप्रांत भ्रमंती करावी, शिक्षकांनी विद्यार्थ्याना आपुलकीची आणि स्वच्छतेची शिकवण देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. हवामान अभ्यासक डख यांनी हवामानाचा अंदाज सांगत जागतिक तापमान वाढ थांबविण्यासाठी, तसेच वाढ दिवसा बरोबर प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केलं. टाकसाळे मार्गदर्शन करताना म्हणाले कि, आदर्श जीवन घडविण्याचे काम शिक्षक करत असतात त्यामुळे शिक्षकांनी शाळेकडे अधिक लक्ष केंद्रित करून त्यांच्यात गुणवत्ता विकसित करावी. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासा बरोबर बौद्धिक उपक्रम राबवावेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना वास्तविक जीवनाची ओळख करून देण्याचे आवाहन टाकसाळे यांनी केले. तसेच जिल्हाधिकारी आंचल गोयल, डॉ.रामेश्वर नाईक, कवी इंद्रजित भालेराव, पंजाब डख, कांतराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव टाकसाळे यांनी केला. जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या कि, विद्यार्थी हे शिक्षकांचे अनुकरण करत असतात. एक जिल्हाधिकारी केवळ जिल्हा बदलू शकतो परंतु शिक्षक असंख्य विद्यार्थ्यांना बदलण्याचे काम करतो. त्यांनी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे महत्वाचे आहे. हाच आत्मविश्वास त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवत असतो. शिक्षकांनी शाळेत रोज नवनवीन प्रयोग करावेत. मुलांच्या हितासाठी झटणारा शिक्षक आदर्श असतो. शिक्षकांनी गावाच्या सामाजिक परिस्थितीत बदल घाविण्याचे काम करावे. बाल विवाह थांबविण्यासाठी व स्वच्छतेच्या सवयी अंगिकारण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आंचल गोयल यांनी केले. तसेच पहिल्या प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश, शिक्षकांच्या भावना, मुलीला शिकवतानाचे अनुभव गोयल यांनी सांगितले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले . सूत्रसंचालन प्रवीण वायकोस तर उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांनी आभार मानले.