परभणी(प्रतिनिधी)ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नियमित लसीकरणाच्या सूक्ष्म नियोजनाचे बळकटीकरण व्हावे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
बुधवारी (दि.७) मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यासाठी नियमित लसीकरण बळकटीकरण संदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक व सर्व वैद्यकीय अधिकारी यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा जैन हॉटेल फंक्शन हॉल येथे पार पडली.
या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ मुजीब सय्यद तसेच शीघ्र प्रतिसाद पथकाचे डॉ महंमद घोडके यांची उपस्थिती होती . कार्यशाळेच्या सुरुवातीला डॉ मुजीब यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची भेट घेऊन नियमित लसीकरण व लसीकरण पासून प्रतिबंधित करता येणाऱ्या आजाराचे नियमित सर्वेक्षण वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. यावर शिवानंद टाकसाळे यांनी याबाबत मोहीम स्वरूपात काम करून लसीकरण पासून वंचित व गळती झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या करून विशेष सत्राचे आयोजन करून लसीकरण करण्याच्या सूचना देऊन लसीकरण पासून प्रतिबंधित आजाराचे नियमित सर्वेक्षण करण्यासाठी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते प्रास्ताविकात मार्गदर्शन करताना म्हणाले कि, नियमित लसीकरण बळकटीकरण करणे अत्यंत गरजेचे असून या कार्यशाळेनंतर दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार विहित कालावधीत सर्व स्तरावर सूक्ष्म नियोजन करून सुधारित कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. कार्यशाळेत लसीकरणामुळे प्रतिबंधित करता येणाऱ्या आजाराचे नियमित सर्वेक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ मुजीब सय्यद यांनी सांगितले.
शीघ्र प्रतिसाद पथकाचे डॉ घोडके यांनी नियमित लसीकरण वेळापत्रक बाबत माहिती दिली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ रावजी सोनवणे यांनी नियमित लसीकरण सूक्ष्म नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या १४ फॉरमॅट बाबत मार्गदर्शन केले दरम्यान प्रमुख उपस्थिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ पांचाळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सिरसुलवार , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ कदम व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ कल्पना सावंत यांची उपस्थिती होती.