परभणी (प्रदिप कोकडवार),दि.08 : सहकारी बँकींग क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ कामगिरी बजाविणार्या वैश्य नागरी सहकारी बँकेस दि. महाराष्ट्र अर्बन को.ऑप. बँक फेडरेशन या संस्थेचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीर झाला आहे.
सहकारी बँकींग क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणार्या नागरी सहकारी बँकांना दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशन या संस्थेद्वारे दरवर्षी सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन 2022 या वर्षीच्या सर्वात्कृष्ट बँक पुरस्काराकरीता 100 कोटीच्या वर व 500 कोटी पर्यंत ठेवी असणार्या बँक या गटातून यावर्षी परभणीच्या वैश्य नागरी सहकारी बँकेस या फेडरेशनचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता भारतीय क्रिडा मंदिर नायगाव वडाळा रोड, वडाळा मुंबई या ठिकाणी पुरस्कार वितरणाचा सोहळा होणार असल्याची माहिती या फेडरेशनच्या संचालिका मुख्य कार्यकारी व सचिव सौ. सायली भोईर यांनी दिली.
दरम्यान, वैश्य नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकरराव चिद्रवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनकडून मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला बँकेच्या जिंतूर सह नऊ शाखा आहेत. सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक हे या सन्मानात सहभागी आहेत. या सार्यांच्या सहकार्यच त्यास कारणीभूत आहे, असे चिद्रवार यांनी नमूद केले.