सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी नागपूर येथील सेवादल महिला महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. राजेश गादेवार यांची नियुक्ती झाली आहे. राज्याचे महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
प्रा. डॉ. गादेवार यांनी बुधवारी सकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. मावळते प्रभारी प्र कुलगुरु डॉ. विकास पाटील यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा पदभार घेतला. यावेळी प्रभारी कुलसचिव सीए श्रेणीक शहा, व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. महेश माने, डॉ. सुरेश पवार आदी उपस्थित होते.
डॉ. गादेवार यांचे वनस्पतीशास्त्रामध्ये पीएच. डी. झाले असून आतापर्यंत त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 67 पेपर पब्लिश झाले आहेत. सोयाबीनवर त्यांचे दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बी अंकुर व शेवाळ या विषयावर त्यांचे विशेष संशोधन झालेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने पीएचडी पूर्ण केले असून एका विद्यार्थ्याचे पीएचडी सुरू आहे. तरुणांच्या उद्योगासाठी स्टार्टअपकरिता नागपूर महापालिकेच्या अंतर्गत त्यांनी विशेष काम केले आहे. इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून दोन वर्षे त्यांनी नागपूरमध्ये स्टार्टअपसाठी सहसमन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आता सोलापूर विद्यापीठात प्र कुलगुरू म्हणून विद्यार्थ्यांसाठी व सर्व संबंधित घटकासाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष काम करण्याचा मानस नूतन प्र. कुलगुरू डॉ. गादेवार यांनी व्यक्त केला आहे.