केज :- केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री आणि काळेगाव घाट येथे अवैद्य धंद्यावर पंकज कुमावत यांच्या पथकाने कारवाई केली.
या बाबतची माहिती अशी की, उत्तरेश्वर पिंप्री आणि काळेगाव घाट येथे अवैद्य धंदे सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे साहेब यांना मिळताच गुरुवार दि.८ सप्टेंबर रोजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस नाईक भागवत निरडे, पोलीस जमादार महादेव बहिरवाळ आणि बजरंग इंगोले यांनी उत्तरेश्वर पिंप्री येथे कल्याण मटका जुगार घेताना प्रकाश छत्रभुज चंदनशिव याच्यावर कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कडून कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम २हजार ६३० रुपयाचे साहित्य ताब्यात घेतले. तसेच काळेगाव घाट येथे हॉटेल गणेश ढाबा येथे देशी व विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने संतोष बलभीम कोठावळे याच्यावर कारवाई करून त्याच्या कडून १२ हजार ४९५ रुपयाची देशी व विदेशी दारू जप्त केली.
प्रकाश छत्रभुज चंदनशिव रा उत्तरेश्वर पिंप्री आणि संतोष बलभीम कोठावळे रा. काळेगाव घाट या दोन्ही आरोपीवर दारूबंदी व जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.