पूर्णा/प्रतिनिधी:-मागील एका महिन्यापासून पूर्णा तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन पिके पाण्याअभावी करपून जात आहे. यामुळे आज मंगळवारी (दि.6) पूर्णा तहसील कार्यालयात शेतकर्यांनी सुकलेले सोयाबीन पिकाचे धाण आणून तालुक्यातील शेतकर्यांना तात्काळ अनुदान देण्याची मागणी केली.
मागील जून-जुलै महिन्यामध्ये संततधार पावसाने मोठी हानी झाली. या अतिवृष्टीमध्ये शेतकर्यांच्या शेतातील कापूस, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके पावसामध्ये वाया गेली होती. त्यानंतर 10 ऑगस्टच्या तारखेनंतर पाऊस गायब झाल्यामुळे ओल्या दुष्काळाखाली दबलेल्या शेतकर्यांना पुन्हा कोरड्या दुष्काळाची भीती निर्माण झाली. मागील एका महिन्यापासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंंतातूर झाले आहेत. शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन धोक्यात आले असून असून सगळीकडे शेतात केवळ वाळलेले, सुकलेले सोयाबीन दिसत आहे. त्यामुळे मंगळवारी पूर्णा तालुक्यातील चुडावा परिसरातील शेतकर्यांनी आपल्या शेतातील वाळलेले सोयाबीन आणून चक्क तहसीलदाराच्या दालनात ठेवले. तालुक्यातील शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.