परळी (दि. 7) - आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात सातव्या दिवशी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल हिने आपल्या नृत्याविष्काराने रंग भरले. सोबतीला आलेली मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांच्यासह विविध कलाकारांनी सादर केलेल्या कलांना परळीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. 

परळी ही प्रभू वैद्यनाथांची भूमी असून, इथल्या नागरिकांना धनंजय मुंडे हे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करून एक आगळी वेगळी पर्वणी उपलब्ध करून देत आहेत, या कार्यक्रमाचा भाग होण्याची मला संधी मिळाली, याचा मनस्वी आनंद असल्याचे ईशा देओल बोलताना म्हणाल्या. त्यांनी मराठीतून आपल्या बोलण्याला सुरुवात केल्याने उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत केले. 

मंगळवारी सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ईशा देओल, मानसी नाईक, यांसह विविध स्टेज कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. 

तत्पूर्वी नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते ईशा देओल, मानसी नाईक व सहकलाकारांचे स्वागत करण्यात आले. नाथ प्रतिष्ठानच्या प्रथेप्रमाणे महिला कलाकारांना साडी भेट देण्यात आली. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख, बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रदीप देशमुख, ऍड. गोविंदराव फड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दिपकनाना देशमुख, शकील कुरेशी, अय्युबभाई पठाण, गोविंदराव मुंडे, संजय फड, बालाजी चाटे, केशव गायकवाड, जयराज देशमुख, शंकर आडेपवार, महादेव रोडे, चेतन सौंदळे, राजेंद्र सोनी, गोविंद कुकर, बाबासाहेब गंगाधरे, वैजनाथराव सोळंके, रवींद्र परदेशी, जालिंदर नाईकवाडे, महेंद्र रोडे, विलासबापू मोरे आदींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.