जिंतूर तालुक्यात यावर्षी अल्पवृष्टी झाल्याने मुग, उडीद, कापूस, सोयाबीनसह इतर पिके शेतकर्‍यांच्या हातातून गेली असल्याने जिंतूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी पुकारलेले रास्ता रोको आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. त्यानुसार जिंतूर तालुका अल्पवृष्टी दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात शासन दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. सन 2018 दुष्काळी अनुदान लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात होणार जमा होणार असल्याची माहिती काँग्रेस कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी दिली. अल्पवृष्टीसह तालुक्यातील विद्युत वितरण संदर्भातील अडचणी तात्काळ सोडवून शेतकर्‍यांना विद्युत पुरवठा सुरळीत करावा व सन 2018 चे जाहीर दुष्काळ अनुदान 63 कोटी 31 लक्ष 67 हजार रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठीचे निवेदन दि.30 ऑगस्ट रोजी राऊत यानी तहसीलदारांना देऊन मागणी केली होती. अन्यथा दि.6 सप्टेंबरला रास्ता रोकोचा इशारा दिला होता. या बाबत सोमवारी (दि.5) तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी बैठक घेऊन जिंतुर तालुका अल्पवृष्टी दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे अधिकार शासन स्तरावर असल्याने त्यांना कळवण्यात आले असून हालचाली युद्धपातळीवर सुरू आहेत. सन 2018 दुष्काळी अनुदानाबाबत अनुदान रक्कम शासनास मागणी केली असून लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाईल व विद्युत पुरवठा संदर्भात विद्युत वितरण कंपनीला आदेशित करण्यात आले आहे. विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात येईल याबाबत सात दिवसांत कार्यवाहीचे लेखी आश्वासन तहसीलदारांनी जिल्हा कार्याध्यक्ष राऊत यांना दिले. त्यानुसार मंगळवारचे नियोजित रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. या बाबत सात दिवसांत सकारात्मक कार्यवाही न केल्यास शेतकर्‍यांसाठीचा मोठा लढा उभारणार असल्याचे राऊत यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीस बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेभाऊ नागरे, केशवराव बुधवंत, अविनाश काळे, कृष्णा दुधगावकर, मोबिन कुरेशी, पप्पु टाकरस, ईरशाद पाशा, तहेसिन देशमुख, वाजेद कुरेशी, वाल्मीक गडदे ,आनिल हेंद्रे, अर्जुन वजिर, माऊली नागरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.