पुणे: येथे एका डॉक्टर तरुणीची विवाहाच्या आमिषाने चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असुन या प्रकरणी एका डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. इम्रान इलाही मुलाणी (वय ४१, रा.चर्मकार गल्ली, सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका डॉक्टर तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डॉ मुलाणी आणि तक्रारदार डॉक्टर तरुणी यांची ओळख असुन हि तरुणी बंडगार्डन रस्त्यावरील एका नामांकित रुग्णालयात कामाला आहे. तीन वर्षांपूर्वी डॉ. मुलाणीने या तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. डॉ. मुलाणीने तरुणीच्या नावावर चार लाख सात हजार रुपयांचे कर्ज काढले होते. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहास नकार दिला आणि रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर डॉ. मुलाणीने लज्जास्पद वर्तन करुन तिचा विनयभंग केला.
त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे डॉ. मुलाणीला सांगितले. तेव्हा त्याने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. डॉक्टर तरुणीने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी तपास करत आहेत.