बार्शी - शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे पदाधिकारी इब्राहीम शेख यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. त्यामध्ये, ते जखमी झाले असून सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवार ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता ही घटना घडली असून याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी इब्राहीम यांच्या फिर्यादीनंतर, पोलिसांनी भादंवि ३२४, ५०४,५०६ आणि ३४ अन्वये ३ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इब्राहीम हे मंगळवार पेठेतील अंग्लो ऊर्दू शाळेजवळ रात्री मित्रांसोबत गप्पा मारत होते. रात्री उशिर झाल्याने मित्र निघून गेल्यानंतर ते एकटेच बसले होते. त्यावेळी, दुचाकीवरुन तिघांनी तेथे येत त्यांना शिवीगाळ आणि माहराण केली. आमच्याविरोधात का बोलतो, तुझ्यानंतर दुसऱ्याचा तर पिच्चरच लावणार आहे, अशी धमकीही अज्ञातांकडून देण्यात आली. तसेच, लाकडी दांडक्याने पायावर, पाठीवर आणि डोक्यात मारहाण केली. त्यामुळे, डोक्यातून रक्तश्राव होऊ लागल. त्यावेळी, इब्राहीम यांनी त्यांचे मित्र पुष्कर पाटील आणि शहाबाज शेख यांना फोनवरुन हकीकत सांगितली. त्यांचे मित्र तात्काळ तेथे दाखल झाले. त्यानंतर, तिघांनी बार्शी शहर पोलीस ठाणे गाठून घडला प्रसंग सांगितल्यानंतर इब्राहीम शेख यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.