सोलापूर :- माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ या तालुक्यांमध्ये जून ते ३ सप्टेंबर या काळात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाच्या भरवशावर लावलेली पिके आता उन्हाच्या तडाख्याने माना टाकत आहेत.या पार्श्वभूमीवर शेतीसाठी कॅनॉल, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे.
उजनी धरण हे सोलापूरसह पुणे व नगर जिल्ह्यासाठी विशेषत: उन्हाळ्यात वरदान ठरले आहे. हरितक्रांतीत उजनीचा मोठा वाटा राहिला आहे. ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांना पाण्याची अडचण निर्माण झाली, त्यावेळी उजनीने शेतीसह माणसांची तहान भागवली. आता पावसाळा सुरू असतानाही ९ ऑगस्टपासून पावसाने ओढ दिली आहे. दुसरीकडे, उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे ऐन भरात आलेली पिके माना टाकत आहेत. त्यामुळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली २०-२५ दिवसांपासून उजनीतून पाणी सोडले जात आहे. मागील आठवड्यात नदीतून सोडले जाणारे पाणी बंद करून सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून २९६ क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ६३ क्युसेक, बोगद्यातून ६०० क्युसेक, मुख्य कॅनॉलमधून तेराशे क्युसेक, वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक पाणी सोडले जात आहे. ज्या भागातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करतात, त्या ठिकाणी तत्काळ पाणी वळविले जात आहे, जेणेकरून फुलोऱ्यात आलेल्या पिकांचे जतन होईल, हा त्यामागील हेतू आहे.