लोहगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..
बिडकिन प्रतिनिधी:-
पैठण तालुक्यातील लोहगाव येथील (३० वर्षीय) तरुणाने गळफास घेऊन आज (शनिवार) सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण मात्र अस्पष्ट असून, मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव गणेश सुभाष मुसळे (रा. लोहगाव, ता. पैठण) असे आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लोहगाव येथील गणेश सुभाष मुसळे (वय ३० वर्ष) या तरुणाने आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ सहाय्यक फौजदार तांगडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळ पाठवून पंचनामा करण्याचा आदेश दिला.
सदरील तरुणाला बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची बिडकीन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे सदरील तरुणाने आत्महत्या का केली याबाबत पुढील तपास करीत आहेत.
रविंद्र गायकवाड, बिडकिन