परळी (प्रतिनिधी)

परळी तालुक्यातील दगडवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सौदागर आबाजी कांदे यांना नुकताच जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. सोमवार, दि.05 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आदर्श शिक्षक सौदागर कांदे 1991 साली शिक्षण सेवेत रुजू झाले. मागील 32 वर्षांत त्यांनी नेमणूक असलेल्या जिल्हा परिषद शाळेत ज्ञानरचना वादावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करत अनेक विद्यार्थी घडवले. आनंददायी शिक्षण पद्धती राबवून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. विद्यावर्धिनी विद्यालय परळी, जिल्हा परिषद शाळा पावन प्रोटीन, जिल्हा परिषद शाळा ब्राम्हवाडी, जिल्हा परिषद शाळा दगडवाडी आदि ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे.

विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून कांदे सरांची ख्याती आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करून आणि त्यांच्यात गोडी निर्माण करून अनेक विद्यार्थी त्यांनी यशाच्या मार्गावर आणले. त्यांच्यामुळेच मागील काळात बीड जिल्हा गणितीय शिक्षणबाबत क्रमांक एकचा जिल्हा राहिलेला आहे. त्यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवार, दि.05 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद बीड येथे हा पुरस्कार सोहळा होणार असून त्यात सौदागर कांदे यांचा गौरव होणार आहे. कांदे सरांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.