सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

3 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यात एका घरात टाकलेल्या छाप्यात एका मोटरसायकलीसह 5 हजार 165 लिटर हातभट्टी दारू व 1 टन 110 किलो गुळ पावडर जप्त करून गुन्ह्यात 3 लाख 59 हजार 450 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षक अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यातील भिमराव काशिनाथ राठोड वय 42 वर्षे, रा. दोड्डी तांडा, ता. दक्षिण सोलापुर याच्या राहत्या घरी धाड टाकली असता त्याच्या घरात व घरासमोरील 2 पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारु व गुळ पावडर साठवून ठेवल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी झडती घेतली असता 200 लिटर क्षमतेच्या 4 प्लास्टिक बॅरलमध्ये 800 लिटर हातभट्टी दारू, 50 लिटर क्षमतेच्या 68 प्लास्टीक कॅनमध्ये 3400 लिटर हातभट्टी दारु, 80 लिटर क्षमतेच्या 12 रबरी ट्यूबमध्ये 960 लिटर हातभट्टी दारु, 1 लिटर क्षमतेच्या 5 प्लास्टीक बाटल्यांमध्ये 5 लिटर हातभट्टी दारु असा एकूण 5165 लिटर हातभट्टी दारुचा साठा जप्त केला, तसेच हातभट्टी दारु तयार करण्याकरिता वापरण्यात येणा-या गुळ पावडरच्या 30 किलो क्षमतेच्या 37 गोण्यातून 1 टन 110 किलो गुळ पावडर जप्त करण्यात आले. तसेच सदर ठिकाणावरुन 4 रिकामे प्लास्टिक बॅरल, 20 रिकाम्या रबरी ट्यूबा, 1 वापरता मोबाईल, एक प्लास्टीक नरसाळे, 1 मोटरसायकल हिरो होंडा स्प्लेंडर जिचा क्रमांक MH04 CX 5127 असा एकूण 3 लाख 59 हजार 450 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी भिमराव काशिनाथ राठोड यास जागीच अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग सदानंद मस्करे करीत आहेत. 

सदर कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त पुणे विभाग अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांचे नेतृत्वात उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक अ विभाग संभाजी फडतरे, निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, अंकुश आवताडे, सुरेश झगडे, सुनिल पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, बिराजदार, मुकेश चव्हाण, जवान ईस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, प्रकाश सावंत, प्रियंका कुटे, शोएब बेगमपुरे, वाहनचालक संजय नवले व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली. 

जिल्ह्यात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हातभट्टी साठवणूकीविरोधात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2022-23 या आर्थिक वर्षात दिनांक 1 एप्रिल ते 31 ऒगस्ट या कालावधीत अवैध दारू विरोधात एकूण 746 गुन्हे नोंदविले असून त्यात 681 वारस गुन्हे असून 643 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर कालावधीत 20759 लिटर हातभट्टी दारु, 1785 लिटर देशी दारु, 592 लिटर विदेशी दारु, 686 लिटर बीअर, 2632 लिटर परराज्यातील दारु, 6429 लिटर ताडी, हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे 2 लाख 53 हजार लिटर रसायन तसेच 75 वाहनांसह एकूण 1 कोटी 78 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाकडून जप्त करण्यात आलेला आहे.

आवाहन

  राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारू / ताडी विक्री, निर्मिती, वाहतूकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू/ ताडी निर्मिती /वाहतूक /विक्री /साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा.