पंचवटी (जि. नाशिक) : भाद्रपद मुख्यत्वे करून ओळखला जातो तो गणेशोत्सवासाठी. भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे. यानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते आणि भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत- वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात हे पूजा विधी बंद असल्याने यंदा महिलांची रामकुंड परिसरात स्नानासाठी तोबा गर्दी केल्याचे बघायला मिळाले. त्यात बुधवारी (ता. ३१) शहरात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली असल्याने रामकुंडातील पाणी रस्त्यावर आलेले होते.
त्यातच ब्राम्हण आणि महिलांनी ऋषिपंचमीची पूजा रस्त्यावर मांडली. त्यामुळे गंगाघाट परिसरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. तर दुपारपर्यंत रामकुंड येथील पोलिस चौकी देखील बंद होती. शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे. रामकुंड परिसरातील अनेक टपरीधारकांनी आपल्या टपऱ्या सकाळीच सुरक्षित स्थळी हलविल्याचे दिसून आले आहे.
 
  
  
  
  