कोल्हापूर:- न्यायालयाचं अटक वॉरंट निघालेल्या मॅकेनिकलला अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितल्याने तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यामुळे आज दुपारी एसीबीच्या पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच घेताना नामदेव औदुंबर कचरे (वय 36) याला रंगेहाथ पकडले. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या परिसरातच ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कचरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ऐन गणेशोत्सवात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
हातकणंगले येथील एका व्यावसायिक असलेल्या मॅकेनिकल विरोधात धारवाड न्यायालयात खटला दाखल असुन न्यायालयीन कामकाजासाठी संबंधित मॅकेनिकल, तक्रारदार हजर राहत नव्हते. त्यामुळे धारवाड न्यायालयाने त्याला अटक वॉरंट बजावले होते. संबंधित आदेशाची प्रत घेऊन हातकणंगले पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस नाईक नामदेव कचरे मॅकेनिकल तक्रारदाराच्या घरी गेले. परंतु कचरे यांनी तक्रारदार यांच्याकडे अटक वॉरंट प्रकरणात मदत करतो असे सांगून दोन हजार रुपये लाच मागितली.
त्यामुळे तक्रारदारांनी कोल्हापूर लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली. आज शुक्रवार (दि 2) रोजी दुपारी हातकणंगले पोलीस ठाण्याच्या आवारात याच पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल नामदेव कचरे याला कोल्हापूर एसीबीने दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबर्गेकर, पोलीस अंमलदार शरद पोरे, विकास माने, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.