सोमवारी बीड येथे पूर्व नियोजनाार्थ बैठक 

बीड प्रतिनिधी 

संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानातून, बलिदानातून व त्यांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा केला. त्याचबरोबर आता मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम दिन देखील आपण येणाऱ्या 17 सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करणार आहोत. मात्र या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत स्वातंत्र सैनिकांच्या विविध मागण्यांना शासकीय स्तरावर न्याय मिळालेला नाही. एवढेच नव्हे तर अमृत महोत्सवी वर्षामध्ये स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या वारस पत्नी, त्यांचे पाल्य यांचा साधे फुल देऊन सुद्धा कुठे सन्मान झाला नाही. ही बाब महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्यात अत्यंत दुर्दैवी आणि दुःख देणारी आहे. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे वारसदार पाल्य मुंबई येथे आझाद मैदानावर 12 सप्टेंबर पासून आपल्या न्याय हक्कासाठी सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीड येथे 5 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्य सैनिक भवन सभागृहात पूर्व नियोजनार्थ आढावा बैठक घेण्यात येणार आहे. 

भारत पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वतःला झोकुन दिल्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या कुटुंबाकडे, मुलाबाळांकडे लक्ष देता आले नाही.ब्रिटिश सरकार अथवा निजामी राजवटमध्ये स्वातंत्र्यसैनिकांची घरे, स्थावर जंगम मालमत्ता, संपत्ती जप्त केली. कुटुंबे उध्वस्त केले. अनेकांना घरदार सोडून भूमिगत राहून कार्य करावे लागले. मात्र त्यांनी लढा सोडला नाही. या देशाला आणि मराठवाड्याला पारतंत्र्यातून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र दुर्दैवाने आज जे काही थोर स्वातंत्र्य सेनानी जिवंत आहेत त्यापैकी बहुतांश हे विविध आजाराने मरणासन्न अवस्थेत आहेत. अनेक जण तर मृत्युमुखी पडले मात्र त्यांच्यावरील अन्याय दूर झाला नाही. अनेक स्वातंत्र सैनिकांनी तर आम्ही पारतंत्र्यात जिंकलो पण स्वातंत्र्यात हरलो आहोत अशा दिलेल्या प्रतिक्रिया मनाला वेदना देणाऱ्या आहेत. राज्यातून अनेक निवेदने स्वातंत्र सैनिकांच्या न्याय हक्का संदर्भात देण्यात आली. मात्र एकाही निवेदनाची दखल शासन व प्रशासन स्तरावर घेतली गेली नाही. तरी देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये जिवंत असलेले स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे वारसदार असलेला परिवार आशावादी होता की, या अमृत महोत्सवानिमित्त आपले प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. परंतु प्रश्न तर कोणतेच मार्गी लागले नाहीत परंतु दुर्दैवाने या अमृत महोत्सवी वर्षात एकाही स्वतंत्र सैनिकाचा अथवा त्यांच्या वारस पत्नी किंवा पाल्यांचा सन्मानाने साधे फुल देऊन सुद्धा शासन व प्रशासनाने सन्मान केला नाही. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या परिवाराने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येत्या 12 सप्टेंबर सोमवार पासून मुंबई येथील आझाद मैदानावर गांधीवादी मार्गाने शांततेने सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रप्रेमी वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक, त्यांच्या वारसपत्नी, त्यांचे पाल्य स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून 75 व्यक्ती 75 तिरंगे झेंडे खांद्यावर घेऊन आझाद मैदान हुतात्मा चौक येथून राष्ट्राचा ऊद्धघोष करणाऱ्या घोषणा देत मंत्रालयासमोर येतील. शासनाच्या विरोधात एकही घोषणा न देता सदरील 75 व्यक्ती मंत्रालयातील राष्ट्रीय तिरंग्याला मानवंदना देऊन रांगेत उभे राहून राष्ट्रगीत म्हणतील. भारत माता की जय, वंदे मातरम या दोन घोषणा देऊन शांततामय मार्गाने पुन्हा आंदोलन स्थळी जातील याच पद्धतीने 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी 10 वाजता आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर आंदोलन स्थळी आझाद मैदानावर 5 वाजेपर्यंत ठिय्या सत्याग्रह करणार आहेत. सदरील आंदोलन करण्याची वेळ स्वातंत्र सैनिक, त्यांचे वारसपत्नी अथवा पाल्यांवर येऊ नये असे वाटत असेल तर शासनाने या प्रमुख मागण्यांना न्याय द्यावा. यामध्ये प्रामुख्याने, स्वातंत्र्य सैनिकांच्या नामनिर्देशित पाल्यांच्या नियुक्ती संबंधी असलेला शासन निर्णय 4 मार्च 1991 च्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी., शासकीय नोकरी करता नामनिर्देशन पत्र करण्यात येते तो उद्देश पूर्ण होईपर्यंत नामनिर्देशन पत्र रद्द समजण्यात येऊ नये. स्वातंत्र्य सैनिक हयात असताना नोकरीसाठी करून दिलेले नामनिर्देशन पत्र स्वातंत्र्य सैनिक मृत्यू पावल्यानंतर रद्दबाबत असलेला 28 फेब्रुवारी 2014 चा अन्यायकारक व चुकीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा., इतर राज्याप्रमाणे स्वातंत्र सैनिकांच्या मानधनांमध्ये वाढ करावी., स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना इतर राज्याप्रमाणे दहा टक्के समांतर आरक्षण देण्यात यावे., इतर राज्यांप्रमाणे स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रथम वारसदारास ओळखपत्र देण्यात यावे., स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरावर शासनामार्फत भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन प्रत्येक स्वातंत्र्यसैनिक व विधवा पत्नी यांचा मानपत्र सन्मानचिन्ह देऊन योग्य तो सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात यावा., किमान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहण सोहळा हा स्वातंत्र्य सैनिक अथवा त्यांच्या वारसदार पत्नी किंवा पाल्य यांच्या शुभहस्ते करण्यात यावा., अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खास भेट योजना म्हणून हयात असलेल्या स्वातंत्र्यसैनिक, त्यांच्या वारस पत्नी ज्यांना यापूर्वी भूखंडाचा लाभ मिळालेला नाही अशांना गृहनिर्माण सोसायटीसाठी निवासी भूखंड शहरालगत देण्याचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करण्यात यावे. अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन स्वातंत्र्य सैनिकांच्या शिष्टमंडळाने दिले आहे. 

सोमवारी बीड येथे बैठक 

मुंबई येथे होणाऱ्या व्यापक स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या पाल्यांच्या सत्याग्रह आंदोलनासंदर्भात पूर्व तयारी करण्यासाठी बीड येथील स्वातंत्र्य सैनिक भवन सभागृहात 5 सप्टेंबर रोजी सोमवारी बैठकीचे आयोजन सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. या बैठकीला बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदार पत्नी, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आणि स्वातंत्र्य सैनिक प्रेमी जागरूक नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या बैठकीला बीड जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार पत्नी आणि पाल्य यांनी उपस्थित राहण्यासाठी आप्पासाहेब शिंदे 99 21 07 07 14 जवाहरलाल सारडा 80 87 50 36 55 वैभव स्वामी 98 22 62 85 21 आणि तुकाराम पटाईत 95 03 95 97 44 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे