वॉकिंगसाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना अमरावती शहरातील भानखेडा मार्गावर उघडकीस आली. संतोष ऊर्फ पापा पडेल राहणार . सुदर्शननगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. चायना चाकूने त्यांचा गळा कापण्यात आला, तर पोटातदेखील वार करण्यात आले. संतोष पछेल हे नेहमीप्रमाणे गुरुवारी छत्री तलाव परिसरात दुचाकी उभी करून भानखेडा मार्गावर फिरायला गेले होते. यावेळी अज्ञातानी त्यांच्यावर चाकूने वार केले. संतोष हे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडून होते. त्यांच्या पोटात चाकू भोसकलेला होता.
ही बाब गस्तीवर असलेल्या सीआर व्हॅनवरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच डीसीपी एम. एम. मकानदार, ठाणेदार अनिल कुरळकर, पोलीस निरीक्षक नितीन मगर, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. संतोष पछेल यांची हत्या का व कुणी केली हे अद्याप समोर आले नसून पोलीस कसून तपास करीत आहेत. टी-शर्ट व लोअरवर असलेल्या संतोष यांना वॉकिंग करीत असताना कुणी बोलावले असावे किंवा लुटण्याच्या हेतूने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे