नाशिक : गणेशोत्सवाला जल्लोषात प्रारंभ होत असताना शहरातील काही भागात कृत्रिम पाणीटंचाई होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. गेल्या चार दिवसांपासून सिडकोतील खुटवडनगर, मुरारीनगर परिसरामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येते आहे. नववसाहत व मोठमोठ्या अपार्टमेंट असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.

गेल्या आठवड्यात शहरातील पाणीपुरवठा तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. परंतु, उलट पूर्वीपेक्षाही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. सिडकोतील प्रभाग २६ मधील खुटवडनगर, वावरेनगर, मुरारीनगर, आदर्शनगर, डीजीपीनगर दोन, महालक्ष्मीनगर, विखे पाटील शाळेच्या परिसरासह आसपासच्या परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

त्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी सिडको विभागीय कार्यालय आणि सातपूर विभागीय कार्यालयाकडे तक्रारही केली आहे. परंतु, अद्यापपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.

प्रभाग २६ चा काही माग सातपूर, तर काही भाग सिडको विभागात विभागलेला आहे. पाणीपुरवठाही सिडको विभागातील जलकुंभातून केला जातो. या परिसरामध्ये नव्याने मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. यातच कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यास इमारतीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे.

इमारतींमध्ये बोअरवेल असले तरी ते वापरासाठीची गरज भागविते, परंतु पिण्यासाठी पाणी नसल्याने नाइलाजास्तव बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते आहे. या अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तर लहान मुलांना या पाण्यामुळे त्रास होतो आहे. तरी या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

"गेल्या चार- पाच दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत आहे. इमारतीतील रहिवासी हेच पाणी पितात. मात्र, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मनस्ताप होतो आहे. मनपाने सुरळीत पाणीपुरवठा करावा." - अरुण फलक, ज्येष्ठ नागरिक, आदर्शनगर.