व्यावसायासाठी व्याजाने दहा टक्के दराने 20 जार रुपये घेतल्यानंतर त्याबदल्यात वेळोवेळी 32हजार 500 रुपये परत दिले. मात्र त्यानंतर देखील 40 हजार रुपयांची मागणी करून पती -पत्नीला डांबून 20 हजार रुपये जबरदस्तीने फोन पेद्वारे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मामा - भाचे असलेल्या दोघा सावकारांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.

शुभम धनंजय जाधव (26रा.बारामती), आशिष उर्फ अशोक मुरलीधर गायकवाड (31रा. बायबास रोड मुंढवा ब्रीज जवळ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत धनकवडी येथील 28वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी 2021 पासून अद्यापपर्यंत सुरू होता. व्यावसायासाठी पैशाची गरज असल्यामुळे फिर्यादीने शुभम याच्याकडून 20 हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात 32 हजार 500 रुपये परत केले होते. मात्र त्यानंतर देखील शुभम आणि त्याचा मामा आशिष हे दोघे 40 हजार रुपयांची मागणी करत होते. पैसे न दिल्याने दोघांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला साईनाथनगर खराडी येथील ऑफिसमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर त्यांच्याकडून बळजबरीने फोनपेद्वारे 20 हजार रुपये उकळले. त्यानंतर देखील आणखी साठ हजार रुपयांची मागणी करत होते. सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने चंदननगर पोलिसांत फिर्याद दिली. यानूसार पोलिसांनी शुभम आणि अशोक या मामा - भाच्यांना अटक केली आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.