उरण तालुक्यातील विंधने कातकरीवाडी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार, दि. 29 ऑगस्ट रोजी तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते विजेच्या मीटर चे वाटप करण्यात आले.

    जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कातकरी उत्थान अभियानाच्या "सप्तसुत्री" उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.

    याप्रसंगी सरपंच निसर्गा डाकी, उपसरपंच, वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री.मिश्रा, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, बी.एम.ठाकूर, सुनील जोशी, रायगड भूषण दत्ता गोंधळी, नामदेव ठाकूर, एकनाथ घरत, माजी सदस्य शक्ती घरत, तलाठी बलभीम लाटे, शिक्षक श्री.पाटील आणि श्री.चोगले आदी मान्यवर उपस्थित होते. 

      कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रा.राजेंद्र मढवी यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि हे विजेचे मीटर देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी केलेल्या मदतीबाबत विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.     

      यावेळी तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी शासनाच्या विविध योजना समजावून सांगितल्या आणि गरजूंना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी श्री.बलभीम लाटे यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले.

       सरपंच निसर्गा डाकी यांनी शक्य असेल त्या सर्व सोयी-सुविधा आदिवासी बांधवांना देण्याचे मान्य केले. संतोष पवार यांनी आदिवासी लोकांनी आपले राहणीमान कसे उंचावले पाहिजे याकरिता मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते बी.एम. ठाकूर यांनी या बांधवांना हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले. 

   महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री.मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कातकरी वाडीतील सर्व घरांना विजेचे मीटर लावून दिले आणि वीज पुरवठा सुरू केला. 

       यावेळी तहसिलदार अंधारे यांनी रेशनकार्ड ऑनलाईन करण्याचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.  

      या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रामपंचायत विंधने आणि सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, प्रा. राजेंद्र मढवी यांनी उरण सामाजिक संस्थेच्या सहकार्याने केले.

     शेवटी सुनील जोशी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.