नाशिक : घरगुती संबंधातून येणे-जाणे असल्याचा गैरफायदा घेत ट्रकचालक असलेल्या संशयिताने दोघा अल्पवयीन बहिणींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित नराधमाविरोधात बलात्कारासह पोस्कोअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृष्णा गुंबाडे (४५, रा. म्हाडा कॉलनी, अंबड) असे संशयिताचे नाव असून त्यास न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता.१) पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलींच्या मातेने अंबड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित कृष्णा गुंबाडे याचे ओळखीतून नेहमी घरी येणे-जाणे होते. याचा गैरफायदा घेत संशयित कृष्णा याने २०१७ मध्ये साडेसोळा वर्षांच्या अल्पवयीन पीडितेला घरात एकटीला गाठून बळजबरीने तिच्या अंगावर कपडे काढले तसेच, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य वारंवार केले होते.
तर, २०२० पासून ते आत्तापर्यंत फिर्यादी मातेच्या दुसरी १५ वर्षांची अल्पवयीन मुलीलाही त्याच्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसेच सदरची बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली.
सदरची घटनेची माहिती पीडित मुलींनी आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार नराधम कृष्णाविरोधात बलात्कारासह पोस्को व विविध गुन्ह्यांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयितास न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता.१) पोलीस कोठडी सुनावली आहे.