नाशिक : मेळा बसस्थानक रस्त्यावरील किशोर सुधारालयासमोर २५ किलो चांदीची लुट करून पसार झालेल्या गुन्हेगारांचा कोणताही सुगावा अद्याप शहर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेला दोन आठवड्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, अद्यापही पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे हाती न लागल्याने पोलिसांच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे.

मेळा बसस्थानकाकडून ठक्कर बाजार बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील किशोर सुधारालयासमोर २१ ऑगला रात्री साडेअकराच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या पाच संशयितांनी चांदीचे पार्सल घेऊन जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्यांना लुटले. तब्बल २५ किलो चांदी आणि कुरिअर कर्मचाऱ्यांचीच मोपेड दुचाकीवरून संशयित पसार झाले होते.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अमितसिंग धनसिंग सिकरवार (२४, रा. फावडे लेन, मुळ रा. उत्तर प्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या घटनेला दोन आठवडे उलटूनही गुन्हेगारांचा कोणताही सुगावा शहर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांकडून यासंदर्भात कसून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले तरीही अद्यापपर्यंत गुन्ह्याची उकल होऊ शकलेली नाही.

त्यामुळे पोलिसांच्या कामकाजावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, गेल्यावर्षी सातपूरमधील उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा घरफोडीची घटना घडली होती. त्या गुन्ह्याचाही अद्यापपर्यंत उकल होऊ शकलेली नाही.

"चांदी लुट प्रकरणात अद्यापपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. त्यासंदर्भातील तपास व पडताळणी सुरू आहे. समांतर तपास गुन्हे शाखाही करीत आहेत. लवकरच गुन्ह्याची उकल होईल." - साजन सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे.