परळी 

नागापूर येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मर येत्या दोन दिवसांत बसविण्यात येणार असून परिसरातील शेतकरी व वीज ग्राहकांची समस्या दूर होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी वीज अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन ट्रान्स्फॉर्मर त्वरित बसविण्यास सांगितले आहे.  

 तालुक्यातील नागापूर वीज उपकेंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर गेल्या दीड महिन्यांपासून दुरुस्ती विना बंद आहे तर दुसरा जळाल्यामुळे बंद आहे, त्यामुळे नागापूर सह परिसरातील बहादूरवाडी, डाबी, दौनापूर, वानटाकळी ,अस्वलंबा, मांडखेल, नागपिंपरी, तडोळी, माळहिवरा, गोपाळपूर, आदी गावातील शेतकरी वीजेविना त्रस्त आहेत.सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके वाळत आहेत. वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे परिणामी उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शेतामध्ये ऊस, सोयाबीन, कापूस, हरभरा, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी आदी पिके असून पाण्याविना त्याचे अतोनात नुकसान होत आहे.

*शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा*

----------------

यासंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांचेकडे तक्रार करताच त्यांनी वीज वितरणचे मुख्य अभियंता लातूर व बीडच्या अधीक्षक अभियंत्यांना सूचना करून ताबडतोब ट्रान्स्फॉर्मर बसविण्यास सांगितले. पुढील दोन दिवसात हा ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी पंकजाताईंना दिला आहे. लवकरच ही समस्या दूर होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.