परभणी दि. 30: विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नवोदित उद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण तयार करुन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, तसेच त्यांच्या स्टार्टअपची स्वप्ने साकार करणेसाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आचंल सुद गोयल, व पोलीस अधीक्षक जयंत मिना, यांच्या हस्ते महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेस परभणी जिल्हयातील व परभणी शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रचार प्रसिध्दी करणेसाठी हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
यावेळी परभणी शहर महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार, मा. योगेश कुमार, सहायक पोलीस अधिक्षक, अरूण सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी, प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी आदींची उपस्थिती होती.
परभणी शहरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्री शिवाजी इंजिनिअरींग महाविद्यालय, यशवंत महाविद्यालय येथे स्टार्टअप यात्रेने भेट दिली त्यानंतर ही यात्रा सोनपेठ व गंगाखेड तालुक्यासाठी रवाना झाली.
महाराष्ट्र राज्य स्टार्टअप यात्रेमध्ये सहभाग नोंदविलेल्या उमेदवारांच्या नवसंकल्पनांचे जिल्हास्तरीय सादरीकरण लवकरच होणार आहे. जिल्हयातील सहभाग नोंदवीण्यात इच्छूक उमेदवारांनी www.msins.in या संकेतस्थळाव्दारे या सादरीकरण सत्रास सहभाग नोंदवावा.
जिल्हास्तरावर सादर करण्यात येणाऱ्या नाविन्यपुर्ण सर्वोत्तम तीन संकल्पनांची निवड करुन अनुक्रमे प्रथम पारितोषिक 25 हजार व्दितीय पारितोषिक 15 हजार तृतीय पारितोषिक.10 हजार देण्यात येणार आहे. तसेच उपरोक्त तीन सहीत इतर सर्वोत्तम सात अश्या एकुण 10 संकल्पनांना पुन:श्च एकदा राज्यस्तरीय पारितोषिकासाठी सादरीकरणाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
परभणी जिल्हयामध्ये महाराष्ट्र राज्य स्टार्टअप यात्रा यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी श्री प्र.सो.खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी, सुमित दिक्षीत, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, प्र.सु. रुद्रकंठवार, व.लि. यांनी योगदान दिले.