पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आवाहन

सोलापूर:- जिल्ह्यात अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थांची निर्मिती होऊ नये यासाठी कृषीसह अन्य विभागांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिल्या. 

पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत श्रीमती सातपुते बोलत होत्या. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, केंद्रीय कस्टम विभागाचे सीमा शुल्क अधीक्षक फुलचंद राठोड, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, औषध निरीक्षक सचिन कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हर्षल थडसरे आदी उपस्थित होते. 

श्रीमती सातपुते यांनी सांगितले की, आपल्या जिल्ह्यात खसखस आणि गांजाची लागवड होऊ नये, याबाबत कृषी विभागाने दक्षता घ्यावी. जिल्ह्यामध्ये गांजाची लागवड होत आहे, ती रोखणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या कृषी सहायकाने पीक नोंदीची माहिती घेताना काही आढळले तर पोलीस विभागाला कळवावे, या कामात हयगय होता कामा नये. 

डॉग स्क्वॉड पथकाने पोस्टाची आणि खाजगी कुरिअरच्या गोडावूनची तपासणी नियमीत करतील. याचबरोबर रेल्वेचे पार्सल गोडावून, शहरातील सर्व कुरिअरची छोटी गोडावून यांची तपासणीही आठवड्यातून करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने रासायनिक कारखाने, 20 साखर कारखान्यामध्ये सुरू असलेल्या को-जनरेशन प्लांटमध्ये अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

प्रत्येक समिती सदस्यांनी तालुका दत्तक घेऊन अंमली पदार्थांचे सेवन केल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती शाळा, महाविद्यालय याठिकाणी द्यावी. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, चुका केल्या तर काय होईल, गुन्हे दाखल होऊन करिअरवर परिणाम होईल, हे पटवून देण्याचे आवाहन श्रीमती सातपुते यांनी केले.