सोलापूर : - तमिळनाडूमध्ये वीरशैव समाज 50 लाखापेक्षा जास्त आहे. समाजाला मार्गदर्शन करून वेळोवेळी संस्कार देण्यासाठी, धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी तमिळनाडूत मठ नाही ही गरज ओळखून रामेश्वर येथे काशीपीठाची शाखा मठ निर्माण करणार असल्याची माहिती काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली.

 या मठामध्ये गुरुकुल, वेद पाठशाळा, यात्री निवास निर्माण करण्याचा संकल्प महास्वामीजींनी केला आहे. काशी महास्वामीजींनी रामेश्वर यात्रा करून सर्व स्थळांना भेटी दिल्या. तेथील मुख्य बसस्थानकासमोर हायवे लगत एक एकर जमीन घेण्याचे महास्वामीजींनी निश्चित केले आहे.  

 दिवाळीमध्ये ही जमीन खरेदी करून महास्वामीजी भक्तांना दिवाळी भेट देणार आहेत. या मठात भक्त, शिवाचार्य, महास्वामीजी निवास, अन्नछत्र होणार आहे. नूतन काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बागलकोट येथील बसवेश्वर वीरशैव विद्यावर्धक संघाचे चेअरमन तथा बागलकोटचे आमदार वीरण्णा चरंतीमठ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती निर्माण करून याचा विकास करण्याचा निर्धार केल्याचे काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

काशी महास्वामीजींनी कर्नाटकातील गदग बिसनळ्ळी येथे पीठाची शाखा काढून वेद पाठशाळेचा प्रारंभ केला आहे. तेलंगणा, आंध्राच्या भक्तांसाठी हैदराबादजवळ शादनगर येथे गुरुकुल आणि शाखा मठाची स्थापना केली आहे. केरळ येथील कोल्लम जिल्ह्यात जंगमवाडी मठाची स्थापना झाली आहे. केरळमध्ये पंधरा लाखाहून अधिक वीरशैव समाज आहे. महाराष्ट्रातील लातूर येथे वेद पाठशाळा, मंदिर स्थापन करून त्या माध्यमातून जनप्रबोधन सुरू आहे. पूर्व जगद्गुरूंनी स्थापन केलेले पुण्यातील शाखा मठ सध्या कार्यरत आहे.

उत्तर भारतात हरियाणातील कुरुक्षेत्रामध्ये पेहवा क्षेत्रात सरस्वती नदीकाठी प्राचीन जंगमवाडी मठ आहे. या मठाचा जीर्णोद्धार काशी महास्वामीजींनी केला आहे. तेथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन महास्वामीजी करीत आहे. प्रत्येक राज्यात काशीपीठाची शाखा मठ स्थापन करून तेथील सद्भक्तांना वेळोवेळी धर्म संदेश, संस्कार देण्याचा महास्वामीजींचा उद्देश आहे.

काशी रामेश्वर यात्रा करणारे हजारो भक्त असतात. काशीहून रामेश्वर, रामेश्वरहुन काशी अशी यात्रा करण्याची परंपरा आहे. काशी जंगमवाडी मठामध्ये यात्रेकरूंसाठी सुसज्ज व्यवस्था आहे. याप्रमाणे रामेश्वर येथे देखील पाच हजार भक्तांसाठी निवास आणि प्रसाद व्यवस्था करण्याची महास्वामीजींची योजना आहे.ही योजना तयार झाल्यानंतर भक्तांसमोर ठेवण्यात येईल. या नूतन योजनेमध्ये भक्तांनी आपापल्या परीने सेवा करावी. योजना पूर्ण करण्यासाठी सर्वांनी संकल्प करण्याचे आवाहन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी केले आहे.