यवतमाळ : महागाव तालुक्यात अतिवृष्टीने संत्रा उत्पादक शेतकरी होळपळून निघाले आहेत. नुकसानीचे सर्वेक्षण करून दीड लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेले.परंतु, आठवड्याचा पहिला दिवस असतानाही अधिकारी, कर्मचारी आढळून आले नाही. शेतकरी बराच वेळ अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत थांबले. अखेर संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकार्‍यांच्या खुर्चीला हार घालून संताप व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आले.