औरंगाबाद:दि.२९ ऑगस्ट (दीपक परेराव) महानगरपालिकेत बांधकाम व्यवसायिकांसाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी. कारण बांधकाम व्यवसायिकांना वेगवेगळ्या परवानगी घेण्यासाठी वेगवेगळ्या विभागात जावे लागते. त्यामुळे सर्वांच्या वेळेचा अपव्यय टाळून कामांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर एक खिडकी योजना राबवावी, अशी प्रमुख मागणी क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया यांची मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली. या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी दिले. ते क्रेडाईच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित सर्वसाधारण बैठकीत रविवारी (ता. २८) प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. 

यासह क्रेडाईने म्हटले आहे की, सिटीसर्वेची हद्द वाढविण्यात यावी. त्याचप्रमाणे शासनातर्फे फंडिंग घेऊन सर्वे करून सातबाराचे रूपांतर पीआर कार्डमध्ये करण्याची तरतूद करण्यात यावी. औरंगाबाद शहराचा विकास होण्यासाठी शहरात मोठे उद्योग येण्यासाठी राज्यस्तरीय प्रयत्न व्हावेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. प्रलंबित पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास औरंगाबाद शहराचा विकास वेगाने होईल. औरंगाबाद प्राधिकरण अंतर्गत सिडकोच्या २६ गावांचा समावेश करावा. सिडको मध्ये टीडीआर वापरण्याची परवानगी द्यावी. तसेच औरंगाबाद शहरातील सिडकोचा प्रलंबित ईपीआय व महापालिकेचा डीपी लवकर पूर्ण करावा, या प्रमुख मागण्या क्रेडाईतर्फे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी केले. 

यावर उत्तर देताना अतुल सावे म्हणाले की, शहराच्या विकासासाठी बांधकाम व्यवसायाचे मोठे योगदान आहे. औरंगाबाद शहर आखीव रेखीव करण्याचे काम बिल्डर करतात. आपण केलेल्या मागण्या माफक असून त्या शासन दरबारी मांडून पाठपुरावा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर करू, असे आश्वासन सावेंनी बांधकाम व्यावसायिकांना दिले. 

यावेळी माजी अध्यक्ष राजेंद्र सिंग जाबिंदा, प्रमोद खैरनार, देवानंद कोटगिरे, पापालाल गोयल, सुनील पाटील, रवी वट्टमवार आणि नरेंद्र सिंह जाबिंदा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे विद्यमान अध्यक्ष नितीन बगडिया, सचिव अखिल खन्ना, विकास चौधरी, संग्राम पठारे, अनिल मुनोत, सुनील राका, पंजाब तौर, रोहित सूर्यवंशी, अजित बापट, बालाजी येरावर, प्रशांत अमिलकंठवार, दीपक कुलकर्णी, भावेन सुखिया, विनोद अग्रवाल, गोपेश यादव, समीर मालखरे, नीलकंठ नागपाल, सौरभ गुप्ता, साहिल कासलीवाल, श्वेता भारतीय आणि हेमा सुखिया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उषा नागपाल, भूपेंद्रसिंग राजपाल आणि महिला विंगच्या सदस्यांचा यांचाही सत्कार करण्यात आला.