परळी (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील अतिसंवेदनशील असलेल्या परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्र परिसरात असलेल्या राखेच्या तळ्यात जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक करण्यात आले आहे.शुक्रवार दि.26 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.राखेचा अवैध उपसा करण्यासाठी हा प्रकार केला असावा असे दिसून येत आहे.

मारोती काचगुंडे,हरिश्चंद्र तुकाराम जाधव व बालाजी लालु चव्हाण या तिघांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 286 सहकलम 3,भारताचा स्फोटक पदार्थ बाबत अधिनियम 1908 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठवाड्यात एकमेव असलेले परळीतील औष्णीक वीज निर्मिती केंद्र नेहमीच राखेच्या प्रदूषणामुळे चर्चेत राहिलेले आहे. अतिसंवेदनशील राहिले आहे.गेले काही वर्षापासून परळी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जाणारे दुर्लक्ष तसेच केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची वाहतुक करण्यासाठी अनेक नियमांची केलेली पायमल्ली यामुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.लाखो झाडांची कत्तल करत गेले 30 वर्षांपासून साठवलेल्या राखेचा उपसा राख माफियांकडून करण्यात आला.मात्र शुक्रवारी राख माफियांनी चक्क महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राजवळ असलेल्या राखेच्या तळ्यात स्फोट घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांच्याकडुन जिलेटीनच्या 103 कांड्या 150 तोटे,बॅटरी,वायर असे स्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात वीज निर्मिती केंद्राची सुरक्षा असते अशी माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि मारोती मुंडे यांनी दिली.