ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. तसेच संबंधीत सेवाही पूर्णपणे राबविल्या जात नाही. यापुढे शहरी भागात नियमितपणे लसीकरणासोबत संबंधित सेवांची सूक्ष्म नियोजनातून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. दिले.२५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शहरी भागातील लसीकरण व संबंधित सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय लसीकरण शीघ्र कृती दलाची सभा जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय काळवांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष कोरे, जिल्हा मात व बाल संगोपन अधिकारी डॉ मिलिंद जाधव, नोडल अधिकारी डॉ. वीरू मनवर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. डी. आर ससे,शिक्षण विस्तार धिकारी अशोक आगलावे,वाशिम तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनीषा चव्हाण, कारंजा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव,डॉ. हितेश सुर्वे, प्रभाग निरीक्षक शिवराज भोंगाडे,अलका मैद,डॉ. मंगेश राठोड, यूनिसेफचे कन्सल्टंट डॉ. राजेश कुकडे व जिल्हा समूह संघटक पुरुषोत्तम इंगोले यांची उपस्थिती होती.  श्री.षण्मुगराजन म्हणाले, शहरी भागात लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी आणि आशा वर्कर यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.आशा वर्करच्या माध्यमातून शहरी भागात सर्वेक्षण करून जे बालक लसीकरणापासून वंचित आहे,त्यांच्या लसीकरणाचे नियोजन करावे. खाजगी व सरकारी दवाखान्यांमध्ये किती बालकांचे लसीकरण झाले आहे, याची माहिती घ्यावी. जी बालके विविध प्रकारच्या लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांच्या घरी जाऊन त्यांचे लसीकरण करण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रोत्साहित करावे. आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घ्यावा.शहरी भागातील ज्या क्षेत्रात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे,त्या भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. त्या भागातील नागरिकांना बालकांच्या लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. शहरी भागात नगरपालिका व आरोग्य विभागाने समन्वयातून लसीकरणाचे काम करावे. तत्पूर्वी सर्वेक्षण करून लसीकरणाचे लाभार्थी निश्चित करावे. लसीकरणासाठी शिबिराचे आयोजन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शीघ्र कृति दल समितीच्या कार्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने यावेळी दिली.शहरी भागात नियमित लसीकरण वाढविणे, आरोग्य विभागाशिवाय इतर विभागाचा लसीकरण कार्यक्रमात सहभाग वाढविणे, शहरी अति जोखमीच्या भागात पर्यवेक्षण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे, शहरी भागात पीआयपी वाटप आणि वापर वाढविणे,विशिष्ट आजाराचा उद्रेक झाल्यास त्याची तपासणी व नोंदणी वेळेवर होणे.आदी विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.