गणेशोत्सवाच्या कालावधीत वेगवेगळ्या ढाब्यावर अवैधरीत्या विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने ट्रक मधून मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या ट्रकवर औरंगाबादच्या उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून शनिवारी मोठी कारवाई केली असून या कारवाईत ट्रकसह 62 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

औरंगाबाद उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 27 ऑगस्ट रोजी विठ्ठल नगर, जाजू नगर इसारवाडी ता. पैठण जि. औरंगाबाद येथे छापा मारला असता त्या ठिकाणी प्रकाश काकासाहेब साबळे (वय 27) व रौनक अंकुश मुळे (वय 23) दोघे राहणार ईसारवाडी ता. पैठण यांनी संगणमताने विदेशी मद्याचा दारू साठा ठोक विक्रीच्या उद्देशाने रॉयल चॅलेंज विस्की 180 मिली क्षमतेचे 30 खोके साठवून ठेवलेले असताना मिळून आले. निरीक्षकांनी विदेशी मद्याचे खोके कुठून आणले असे विचारले असता त्यांना मद्याचा खोके ईसारवाडी येथील पैठण - औरंगाबाद रोडवर उभे असलेल्या अशोक लेलँड ट्रक (क्रमांक एम एच 20 डी इ 7325) मधून घेतल्याचे सांगितले. त्या माहितीनुसार तात्काळ ट्रकचा शोध घेतला असता मद्याचा ट्रक हा पैठण - औरंगाबाद रोडवर ईसारवाडी शिवारात उभा असलेला दिसून आला. या वाहनाची पथकाने सखोल तपासणी केली असता ट्रकमध्ये युनायटेड स्पिरिट लिमिटेड चिकलठाणा औरंगाबाद या विदेशी मद्य निर्मिती कारखान्यातून वाहन वैद्य वाहतूक परवान्या अंतर्गत दिनांक 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट वैद्य परवान्याच्या कालावधीपर्यंतचा होता. ट्रकचा मार्ग अहमदनगर -दौंड- कोल्हापूर असा नमूद केलेला असताना हे वाहन औरंगाबाद - पैठण रोडवर ईसारवाडी शिवारात संशयितरित्या सापडले. या वाहनातील मद्याच्या खोक्यांची मोजणी करण्यात आली. यात डायरेक्टर स्पेशल ब्लॅक डीलर्स डीलक्स व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 150 खोकी,  डायरेक्टर स्पेशल ब्लॅक डीलक्स व्हिस्की 375 मिल्क क्षमतेची 50 खोकी, डायरेक्टर स्पेशल ब्लॅक डीलक्स व्हिस्की 650 मिली क्षमतेचे 150 खोके, डायरेक्टर स्पेशल ब्लॅक डीलर्स व्हिस्की 200 मिली क्षमतेचे 150 खोके, डायरेक्टर स्पेशल व्हिस्की 180 मिली क्षमतेचे 50 खोके, रॉयल चॅलेंज विस्की 180 मिली क्षमतेचे 170 खोके असे ट्रकमध्ये एकूण विदेशी मद्याची 720 खोके आढळून आले. दरम्यान,  वाहतूक पासनुसार या वाहनामध्ये 650 खोके असणे आवश्यक असताना ट्रकमधील 30 खोके हे अवैधरित्या ट्रक चालकाने विक्रीसाठी काढून ठेवल्याचे दिसून आले. एका पांढऱ्या रंगाची अशोक लेलँड ट्रक (क्रमांक एम एच 20 डीई 7325) सह एकूण रुपये 62 लाख 14 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  यातील आरोपी यांना विचारणा केली असता हे मद्य विकास काकासाहेब साबळे, वाहन चालक व 24 वर्ष राहणार इसारवाडी यांनी तीस खोके विठ्ठल नगर, विसरवाडी या ठिकाणी आम्हाला काढून ठेवल्याची त्यांनी कबूल दिली. हे मद्य अवैधरित्या गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये धाब्यावर विकण्याचा मनसुबा होता असे आरोपीकडून सांगण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप, संचालक सुनील चव्हाण, औरंगाबाद विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार, औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग औरंगाबादचे निरीक्षक शहाजी शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस के वाघमारे, सुभाष गुंजाळे नवनाथ घुगे, राहुल बनकर, विनायक चव्हाण हर्षल बारी यांच्या पथकाने केले.