सोलापूर- येथील राहुल संजय ढेरे वय-24 वर्षे, धंदा-शेती, रा- गलंदवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर याने फिर्यादीच्या मुलाचा विजेच्या शॉक द्वारे खून घडवून आणल्या प्रकरणी त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश मोहोळ येथील मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. ऋषिकेश जाधव साहेब यांनी मोहोळ पोलिसांना दिला.
यात हकीकत अशी की,फिर्यादी दिनकर बिरा ढेरे हा त्याच्या परिवारासह बोपले तालुका मोहोळ येथे राहण्यास होता. आरोपी राहुल संजय ढेरे हा फिर्यादीचा पुतण्या आहे. सन 2019 सालापासून फिर्यादी व आरोपी मध्ये जमिनीच्या वाटणीबाबत वाद चालू होता. त्यामुळे बऱ्याच वेळा आरोपी व त्याचे वडिलांनी फिर्यादी व त्याचे मुलास जीवे मारण्याची धमकी दिली होती. फिर्यादी दिनकर बिरा ढेरे व आरोपी राहुल संजय ढेरे यांची शेत जमीन बोपले हद्दीत एकमेकांच्या लगतच होती. वादामुळे आरोपी अगर त्याचे परिवार फिर्यादीच्या हद्दीत शेतामध्ये येत नव्हते. फिर्यादीचे शेतामध्ये पलीकडच्या बांधावर एक विद्युत पोल होता व त्यास दोन विद्युत मीटर कनेक्शन होते. आरोपीने दि. 12/6/2021 रोजी उघड्या असलेल्या मीटर पेटीतून पाठीमागे असलेल्या लोखंडी मीटर पेटीस वायरीने विद्युत कनेक्शन देऊन ती पेटी विद्युत प्रवाहने भारित केली. सदर दिवशी फिर्यादीचा मुलगा नवनाथ ढेरे हा सकाळी पिकांना पाणी देणेकरिता गेला, त्यावेळी सदर लोखंडी पेटीस हात लावता क्षणीच त्यास विजेचा जोराचा धक्का बसून तो जागीच निधन पावला. अशाप्रकारे योजनाबद्धरित्या कट आखून आरोपी राहुल ढेरे याने फिर्यादीचा मुलगा नवनाथ ढेरे याची हत्या घडवून आणली. त्यानंतर पोलिसांनी सदरचे प्रकरणाची अपघाती मृत्यू अशी नोंद करून प्रकरण निकाली काढले. त्यानंतर न्याय मिळण्याकरिता फिर्यादी दिनकर बिरा ढेरे यांनी वरिष्ठ पोलिसांकडे अर्ज दाखल केला परंतु पोलिसांनी काहीच दाद न दिल्यामुळे फिर्यादीने ॲड. प्रशांत नवगिरे यांचेमार्फत मोहोळ येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली. फिर्यादीतर्फे खाजगी फिर्याद दाखल करून वर नमूद वस्तूस्थिती मे. न्यायालयासमोर मांडली. तसेच प्रस्तुत प्रकरणात ज्या वायरीने विद्युत पेटी भारित केली होती ती वायर जप्त करण्याची आहे, सदरील घटना घडल्यानंतर लागलीच विद्युत महामंडळाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती व टेन्ट लंप ने तपासणी केली असता त्यांना मीटर पेटीत कोणताही करंट दिसून आला नाही, इनकमिंग केबल व आउटगोइंग केबल व्यवस्थित आढळले असा जबाब संबंधित विद्युत कर्मचाऱ्यानी दिला होता या सर्व संशयित बाबी पोलीस तपासाशिवाय शक्य नसल्याचे मे. न्यायालयासमोर मांडले. फिर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद व सादर केलेले सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य धरून मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री ऋषिकेश जाधव साहेब यांनी आरोपी राहुल संजय ढेरे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश मोहोळ पोलिसांना दिले.
यात फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. अमोल देशपांडे व ॲड. श्रीपाद देशक यांनी काम पाहिले.