तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून केला होता खून 

सोलापूर : सोलापूरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी आरोपी भिमाशंकर सिद्राम झळके वय ४२ वर्षे व आरोपी शिवराज गुरुनाथ माळी वय २५ वर्षे, रा. सोलापूर यांना प्रकाश अशोक चव्हाण वय ४२ वर्षे, राहणार येमुल विहार, अपार्टमेंट, गेंटयाल चौक, सोलापूर याचा खून केल्या प्रकरणी भा.दं.वि. कलम ३०२ सह कलम ३४ प्रमाणे दोषी धरण्यात आले व दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

सदर प्रकरणात सविस्तर हकिकत अशी की, दि. २६/०७/२०१७ रोजी फिर्यादी अशोक कृष्णातसा चव्हाण हे सकाळी १०.०० वा. सुमारास मयत प्रकाशचे एम.आय.डी.सी. रोड लाहोटी कारखान्याच्या जागेत असलेले कुल वेअर नावाचे रेडिमेड दुकानात गेले होते. त्यावेळी दुकान फिर्यादीचा नातू हा दुकान उघडून बसलेला होता. दु.१२.०० वाजता सुमारास फिर्यादीचा मुलगा मयत प्रकाश हा दुकानात आला होता. तो आल्यानंतर फिर्यादी व त्याचा नातू ओम घरी गेले. त्यावेळेस मयत प्रकाश एकटाच दुकानात होता. फिर्यादी त्याचे घरी असताना दुपारी पावणे दोनच्या सुमारास फिर्यादीचे पाहूणे वासू मिस्कीन याने फिर्यादीस फोन करुन कळविले की, मयत प्रकाशचे दुकानात काहीतरी झालेले आहे. त्यास सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर येथे उपचाराकरिता दाखल केले आहे. असे कळल्याने फिर्यादी लगेच सिव्हील हॉस्पीटल येथे ओपीडीमध्ये जावून पाहिले असता फिर्यादीचा मुलगा प्रकाश हा मयत अवस्थेत होता. तेथे पोलिस व डॉक्टर हजर होते. मयत प्रकाश यास उजव्या हाताचे तळहातावर व पाठीत उजवे बाजूस जखमा झालेल्या व रक्तस्त्राव होत असल्याचे दिसत होते. 

इतर ठिकाणी खरचटलेले दिसत होते. पोलिसांना मयत प्रकाशच्या दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे आहेत, अशी माहिती फिर्यादीने दिल्याने ते पाहण्याकरिता फिर्यादी त्यांना सोबत घेवून दुकानात गेले. दुकानातील सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता दु. १.३० वा. सुमारास फिर्यादीचा मुलगा प्रकाश हा दुकानातील काउंटरवर बसलेला असताना अंदाजे २५ ते ३० वयोगटातील दोन अनोळखी इसम आले. ते दोघे मयत प्रकाशशी चर्चा करत असताना दिसत होते. चर्चा करत असताना मयत प्रकाश हा त्याच्या मोबाईल फोनवरुन बोलत असताना त्याचा फोन बंद झाल्यानंतर अचानक त्यातील एका इसमाने त्याच्या जवळील धारदार हत्यार काढून मयत प्रकाशचे छातीवर वार केले. त्यावेळी मयत प्रकाश याने मधे हात घातल्याने ते हत्यार त्याच्या हाताला लागले व मयत प्रकाश त्या इसमास चुकवून दुकानातील काउंटरला वळसा मारून दुकानाचे बाहेर येत असताना हत्याराने मारणारा इसम हत्यार घेवून काउंटरवरून उडी टाकून काउंटरचे दुस-या बाजूला जावून मयत प्रकाशच्या पाठीमागे लागला. मयत प्रकाश दुकानाचे बाहेर येत असताना हत्यार मारणारा इसमासोबत असलेल्या त्याचे साथीदाराने मयत प्रकाशला आडवण्याचा प्रयत्न करुन त्याने मयत प्रकाश यास पाठीमागून धक्का देवून खाली पाडल्याचे दिसत होते. त्यानंतर तो तेथून उठून पळत जात असताना ज्या इसमाच्या हातात हत्यार होते त्या इसमाने मयत प्रकाशला पाठीमागून पाठीत हत्यार मारल्याचे दृश्य त्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत होते. त्यानंतर ते दोन्ही इसम त्यांचे दुचाकीवरुन पळून जात असताना दिसले. 

सदर सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसणारे इसम हे आरोपी भिमाशंकर सिद्राम झळके व आरोपी शिवराज गुरुनाथ माळी हे असून त्यांनी संगनमत करुन पैशांचे देवाणघेवाणच्या कारणावरुन मयत प्रकाश यास धारदार हत्याराने उजव्या हाताचे तळहातावर व पाठीत उजवे बाजूला मारुन गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले आहे. त्याबाबत फिर्यादी अशोक कृष्णातसा चव्हाण यांनी एमआय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिली असता पोलीसांनी आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम ३०२ सह कलम ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवून पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सरकारपक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी न्यायालयात १८ साक्षीदार तपासले. सदर प्रकरणात प्रथम दर्शनी पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, वैदयकीय पुरावा, सीसीटिव्ही फुटेज, जप्ती पंचनामे, न्यायवैदयकीय अहवाल आणि आरोपींनी दिलेले निवेदन पंचनामा या सर्व गोष्टींवरुन सदर आरोपींनी संगनमत करुन मयत प्रकाश याचा निर्घृणपणे खून केल्याचे व ते सिध्द केल्याचे युक्तीवादात सांगण्यात आले. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन आजरोजी यातील आरोपी भिमाशंकर सिद्राम झळके व शिवराज गुरुनाथ माळी यांना खुन करणे याबाबत दोषी धरण्यात आले होते.

सदर प्रकरणात आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी झाली असता मे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना भा. दं. वि. कलम ३०२ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा ठोठावली व दोन्ही आरोपींना प्रत्येकी २० हजार दंड ठोठावले व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर दंडाची रक्कम ही मयताची पत्नी व तीन अपत्ये यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचा आदेश झाला.

सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले. तर आरोपी क्रं. १ व २ यांच्या वतीने अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे व पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस हवालदार ब. नं ७७१, एस.एस. चव्हाण व पोलिस नाईक ब.नं. १२५३, प्रविण जाधव यांनी काम पाहिले आहे.