खामगाव (बुलढाणा) - ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या देव्हारी गावाचे पुनवर्सन रखडले आहे. गावातील नागरिकांना वन्य प्राण्यांच्या दहशतीत जगावे लागत आहे. गावाच्या शेतशिवारात अनेकदा बिबट, अस्वलसारखे हिंस्त्र पशू फिरत असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते.देव्हारी गाव ज्ञानगंगा अभयारण्यात आहे. या गावाचे पुनर्वसन होणार आहे. त्यामुळे गावात कोणतेही विकासकामे करण्यात येत नाही. गावातील रस्ते, नालीच्या अनेक समस्या आहेत. गावात जाण्याकरिता रस्ता नाही. त्यामुळे गावकऱ्यांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो. एकीकडे पुनर्वसन होत असल्याने गावात विकासकामे करण्यात येत नाही तर दुसरीकडे गावाचे पुनर्वसनही करण्यात येत नाही. त्यामुळे गावकरी अडचणीत सापडले आहेत. गाव अभयारण्यात असल्याने वारंवार बिबट, अस्वलसारख्या हिंस्त्र पशूंचा गावकºयांना सामना करावा लागतो. आतापर्यंत गेल्या दोन वर्षात ३५ ते ४० शेतकºयांची पिके वन्यप्राण्यांनी नष्ट केली. तसेच ७ जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
*जीव धोक्यात टाकून करावे लागते पिकांचे रक्षण*
परिसरात रानडुकरांसह, नीलगाय, हरीण व इतर वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. बरेच शेतकरी जीव धोक्यात टाकून रात्र जागून पिकाची राखण करीत आहे. मात्र, वन्यप्राणी नासाडी करतात. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. वन्यप्राण्यांमुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
गावाचे पुनर्वसन त्वरीत करणे गरजेचे आहे. गावातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वन्य प्राणी पिकांचे नुकसान करतात. तसेच ग्रामस्थांच्याही जीवाला धोका आहे.
- जे. डी. झिने, ग्रामस्थ