नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल तालुक्यात आहे. या अनुषंगाने उलवे, वहाळ,बंबावीपाडा आदी गांवाना लागून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर आहे. येथे अनेक डोंगरे असल्याने विमानतळासाठी हे डोंगरे अडथळे ठरत आहेत. त्यामुळे हे डोंगर ब्लास्टींग(स्फोट )करून जमीन सपाट करण्याचे काम प्रशासनाकडून चालू आहे. मात्र विमानतळाला लागूनच नागरिकांची घरे असल्याने डोंगरात विमानतळाच्या कामासाठी होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे आजू बाजूच्या गावातील अनेक घरांना तडे गेलेली आहेत. तर काही घरे ब्लास्टिंग मूळे मोडकळीस आली आहेत. काही घरांचे स्लॅब सुद्धा अनेकदा कोसळले आहेत.

पनवेल तालुक्यातील बंबावी पाडा या गावातील गणेश मुंडकर यांच्या घराचे स्लॅब कोसळून मोठे नुकसान झाले आहे. विमानतळाच्या कामासाठी होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे हा प्रकार घडल्याने गणेश मुंडकर यांच्यावर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. दोन वेळच्या जेवणाची सोय करताना अगोदरच नाकी नऊ आले असताना आणखीनच या संकटाची भर गणेश मुंडकर यांच्यावर पडली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते नविन घर पुन्हा बांधू शकत नाहीत. घराचे स्लॅब कोसळल्याने तो स्लॅब परत टाकायचा खर्चही परवडत नसल्याने मंडकर कुटुंबीय चिंतेत आहेत . शासनाने त्वरित या घटनेची दखल घेऊन पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी प्रशासनाकडे गणेश मुंडकर यांनी केली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात होणाऱ्या ब्लास्टींग मूळे आजपर्यंत अनेक घरांना तडे गेली आहेत. अनेकांची घरे पडायला आली आहेत.शासकीय अधिकारी येतात पंचनामा करतात मात्र नंतर कोणतेही कारवाई होताना दिसून येत नाही.

      प्रशासन योग्य ते सहकार्य नुकसानग्रस्तांना करीत नाही.अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे अशा वारंवार घडणा-या घटनांचा प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नुकसानग्रस्तांना त्वरित नूकसान भरपाई कशी मिळेल याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.