नागरी समस्यांकडे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा दुर्लक्ष होत असतानाच आणि पेणचा विकास खुंटत चालला असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकारांनीच आता पुढाकार घेऊन पेणच्या विकासात्मक दृष्टिकोनाचा पवित्रा घेऊन सहयाद्री प्रतिष्ठान व सोबती संस्थेने दिलेल्या हाकेला साद देत मुंबई - गोवा महामार्गावर गेली अनेक वर्षे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांबाबत थेट स्वकष्टाने आणि स्वखर्चाने खड्डे भरण्यासाठी जन आक्रोश आंदोलन केले. पेण तालुक्यातील पत्रकार, सहयाद्री प्रतिष्ठान आणि सोबती संस्थेने एकत्र येऊन या आंदोलनाच्या दिलेल्या हाकेला पेण तालुक्यातील असंख्य सामजिक संघटना, प्रवासी संघटना, वाहन संघटना, विदयार्थी युनिट आणि विशेष करून सुहीत जीवन ट्रस्ट मधील गतिमंद विदयार्थी देखील खड्डे भरण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
यावेळी बोलताना पेण मधील नागरीक चंद्रकांत म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या महामार्गाबाबत शासन आणि प्रशासन निद्रावस्थेत असुन दरवर्षी केवळ खड्डे भारण्यासाठी करोडो रुपये वाया जात आहेत. या महामार्गाचे योग्य दर्जाचे काम होणे गरजेचे आहे. कमी नफा आणि जास्त काम हे सूत्र वापरून सामान्य जनतेचा प्रवास सुखकर कसा होईल याचा गांभीर्याने विचार शासनाचे करायला हवा असे सांगितले.तर सूहीत जीवन ट्रस्ट मतिमंद मुलांच्या शाळेच्या अध्यक्षा सुरेखा पाटील यांनी बोलताना रस्त्यावरील खड्डे पाहता आमच्या मुलांना शारीरिक त्रास होतो. समाजाचा एक भाग म्हणून त्यांचा विचार करून तरी हे रस्ते मजबूत करावेत आणि म्हणूनच आम्ही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला असल्याचे सांगितले. तसेच हे रस्ते लवकरच सिमेंटचे करण्याची मागणी त्यांनी शासनाला केली आहे. एकूणच आजच्या पत्रकारांच्या आणि पेण मधील समजिक संघटनेच्या एकत्र येऊन केलेल्या या कामाचे पेण मधील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असुन याच संघटनांच्या आणि पत्रकारांच्या एकजुटीने पेण मधील इतर समस्या सुटू शकतील अशी आशा पेण मधील नागरीक व्यक्त करू लागले आहेत. यावेळी मराठी कोकण परिषद सचिव विजय मोकल,पेण पत्रकार संघटना, सहयाद्री प्रतिष्ठान, सोबती संस्था यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे, राजकीय पक्षांचे, विदयार्थी आणि जेष्ठ नागरिक, महीला वर्गाचे आभार मानले.