ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील आणि दारिद्रय रेषेवरील कष्टकरी गर्भवती महिला, तनदा माता आणि त्यांचे नवजात बालके कुपोषित राहू नये तसेच मातामृत्यू आणि बालमृत्यू दरात घट व्हावी यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्हयात आतापर्यंत 33 हजार 489 महिलांना याचा लाभ मिळाला आहे. गर्भवती आणि स्तनदा मातांना 5 हजार रुपयांचा लाभ प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून देण्यात येतो. 1 जानेवारी 2017 पासून या योजनेची सुरुवात झाली आहे. 24 ऑगस्टपर्यंत 2022 पर्यंत जिल्हयातील 33 हजार 489 महिलांना या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ देण्यात आला असून या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 कोटी 21 लक्ष 11 हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा मातेला 1 हजार रुपये, 2 हजार रुपये आणि 2 हजार रुपये अशा तीन टप्प्यात एकूण 5 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात.वाशिम तालुक्यात 7 हजार 369, मालेगांव 4 हजार 710, रिसोड 4 हजार 744, मंगरुळपीर 5 हजार 439, मानोरा 4 हजार 123 आणि कारंजा तालुक्यातील 7 हजार 74 अशा एकूण 33 हजार 489 गर्भवती व स्तनदा मातांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेच्या लाभामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार मिळण्यास मदत झाली आहे. त्यांच्या आरोग्यात सुधारणा होऊन जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्यही सुधारण्यास मदत झाली आहे. मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण या योजनेमुळे घटले आहे.