कर्नाटकातील भट्टारकश्री अकलंक स्वामीजी उपस्थित राहणार

सोलापूर - भुसार पेठेतील श्री. दिगंबर जैन माणिकस्वामी महाराज मंदिरात रविवारी २८ व सोमवारी २९ ऑगस्ट रोजी जीर्णोध्दारित जिनमंदिर शुद्धी समारोह व श्री कालिकुंड पार्श्वनाथ विधानाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक राज्यातील तेराशे वर्ष प्राचीन स्वादी मठ सौंदा येथील पूज्य भट्टारकश्री अकलंक स्वामीजी यांच्या मंगल सानिध्यात हा कार्यक्रम होणार आहे. तरी जैन भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दिगंबर जैन माणिकस्वामी महाराज मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जिनधर्माचा ऐतिहासिक ठेवा

सोलापूर येथे येऊन स्थायिक झालेल्या गांधी परिवाराने भव्य जैन मंदिर भुसार पेठेत उभे करून श्रद्धा, भक्ती व परोपकार अशा जैन तत्वांचा परिचय येथील मातीला करून दिला. ‘श्री दिगंबर जैन माणिकस्वामी महाराज’ नावाने परिचित असलेले हे जैन मंदिर श्रीमान रामचंद हेमचंद दलजी गांधी यांनी सन १८४५ मध्ये स्थापन केले. तेव्हापासून १७७ वर्षे या मंदिराची संपूर्ण व्यवस्था स्व. श्रीमान भाऊसाहेब गांधी परिवाराकडूनच होत आहे. सोलापूर जिल्ह्यात या परिवाराने वागदरीमध्ये आणि अक्कलकोट येथे जैन मंदिराची उभारणी केली होती. एकूणच गांधी कुटुंबीयाने तीन जैन मंदिराची उभारणी केली आहे.

अतिशयकारी भगवंताची मूर्ती

श्री माणिकस्वामी भगवंताची मूर्ती ही अतिशयकारी आहे. मंदिराच्या वर्तमान परिस्थितीची आवश्यकता ओळखून पावणेदोनशे वर्षाचा इतिहास होत असताना मंदिराचा मूळ गर्भगृह व जिनबिंब सुरक्षित ठेवून त्या समोरील सभामंडपाचा जीर्णोद्धार करण्याची मनोभावे इच्छा डॉ. रणजित हिरालाल (भाऊसाहेब ) गांधी आणि त्यांच्या परिवाराची होती. २०१९ मध्ये परमपूज्य उपाध्यायश्री सुमित्रसागरजी महाराज यांच्या ससंघ सान्निध्यात सभामंडप जीर्णोद्धार शुभारंभ सोहळा मोठ्या भक्तिपूर्ण आणि विधिपूर्वक पार पडला. मंदिराचे गर्भगृह व जिनबिंब सुरक्षित ठेवून परमपूज्य मुनिश्री १०८ आगम सागरजी महाराज आणि पुनीतसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण झाले. सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच मंदिरात उभे करण्यात आलेल्या बीज-स्तंभावर पवित्र बीजाक्षरे, २४ तिर्थकरांचे लांछन, तीर्थंकरांच्या मातेची १६ स्वप्ने, अष्टप्रातिहार्य आणि अष्टमंगल कोरली गेली आहेत. मंदिर शिखराचा पूर्ण जीर्णोद्धारसह आकर्षक रंगसंगतीने शिखर उजळून निघाले आहे. पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी दगडातील कोरीव कामामुळे मंदिर अतिशय देखणे बनल्याने वैभवसंपन्न पवित्र वास्तूची अनुभूती श्रावकांना लाभत आहे. मंदिरातील आभामंडल भक्तिपूर्ण चैतन्याने भरले आहे. या आध्यात्मिक चैतन्याकडे श्रावक सहजच आकर्षित होत आहेत.