पुणे: थिएटर व्यावसायिकदृष्ट्या लोकप्रिय होण्यास थिएटर स्टार निर्माण व्हावेत त्यामुळे थिएटर अधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने नाट्य कलावंत अंजन श्रीवास्तव यांनी येथे केले. सिनेक्षेत्रातील मान्यवर कलावंतांच्या कार्य कर्तुत्वाची माहिती असलेल्या डॉ. राजू पाटोदकर लिखित ‘चंदेरी सितारे’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

 पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या या समारंभाच्या वेळी अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे निवृत्त संचालक श्रीनिवास बेलसरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट तसेच नावीन्य प्रकाशनचे नितीन खैरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 सिनेसृष्टी तसेच पत्रकारितेच्या आठवणी जागवताना अंजन श्रीवास्तव म्हणाले, प्रेक्षकांमुळे कलावंतांना ओळख मिळते. रंगमंच एक अशी बाब आहे जिथे कधी ना कधी आपली ओळख निर्माण होते. अशा यशस्वी कलावंतांवर ‘चंदेरी सितारे’ सारखी पुस्तके प्रकाशित व्हावीत असेही ते म्हणाले. हे पुस्तक हिंदी भाषेतही प्रकाशित व्हावे, अशी सूचना करुन पुस्तकास शुभेच्छा दिल्या.  

यावेळी ते म्हणाले, मी पहिल्यापासून पुणे आणि पश्चिम बंगालला साहित्यनगरी समजतो. याच पुण्यातील आपले लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे हे केवळ पुणे, महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे वैभव आहे. तसेच’ वागळे की दुनिया ’ चे सर्वेसर्वा ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्याही भावपूर्ण आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आर.के. हे व्यंगचित्रकार, पत्रकार आणि त्यापलीकडेही परिपूर्ण चित्रपट निर्माते होते, असे सांगून त्यांनी आपल्या 55 वर्षाच्या नाट्यक्षेत्रातील प्रवास, सिनेपत्रकार आणि प्रसिध्दीबाबत खास शैलीत विचार मांडले. 

या कार्यक्रमाला माहिती जनसंपर्कच्या माजी संचालक श्रीमती श्रध्दा बेलसरे, निवृत्त उपसंचालक वर्षा शेडगे, स्टेज आर्टिस्ट आणि म्युझिशीयन डॉ. गिरीश चरवड, जनसंपर्क तज्ज्ञ भूपेंद्र मुजुमदार, प्रा. डी. एस. कुलकर्णी, काटे क्लासेसचे प्रमुख प्रा. बाळकृष्ण काटे, आनंद सराफ, डॉ. प्रशांत दुरुगकर, ॲड. संजय देव, उद्योजक शाम टेकाळे, संजय परळीकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत कारेगांवकर, दिग्दर्शक अजिंक्य काटे, बाल कल्याण समिती सदस्य सारिका अगज्ञान, कलावंत शितल करंजे, संपादक, कलावंत, पत्रकार, नागरिक उपस्थित होते.