जितेंद्र जाधव
इंदापूर/ प्रतिनिधी:-
पुणे जिल्ह्यासह बारामती पोलीस उपविभागामधील सर्व पोलीस स्थानकांमध्ये "निर्भया" हे पथक सक्रीय असल्यामुळे प्रो अॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई करत आहे.हे पथक प्रोअॅक्टीव्ह आणि रिअॅक्टीव्ह दोन्ही पद्धतीचं पोलिसिंग करत आहे. यामुळे महाविद्यालयीन व विद्यालयीन मुला मुलींमध्ये सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.
बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील विविध शिक्षण संस्थांमध्ये निर्भया या पथकाने भेटी देऊन अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांवरील घडणारे गुन्हा संदर्भात माहिती देण्यात आली. या पथकामध्ये पोलीस हवालदार अमृता भोईटे, पोलीस हवालदार उमा कोकरे, पोलीस हवालदार रूपाली थोरात, पोलीस हवालदार सुनील धगाटे, पोलीस हवालदार प्रवीण अभंग तसेच सामाजिक कार्यकर्त्या छाया सरड व महिला दक्षता कमिटी सदस्य अनिता खरात यांच्या माध्यमातून सदर निर्भया पथका विषयी माहिती देत. शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना त्रास देणाऱ्या व छेड काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई हे पथक करत आहे. तसेच जनजागृती आणि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी आपुलकी वाढवण्याचे काम पथकाकडून केले जात आहे. "निर्भया हे पथक" शाळा कॉलेजमध्ये जाऊन विविध कार्यक्रमांच्या माध्यमामधून सुरक्षित वातावरण तयार करण्याचं काम हे पथक करत आहे अशी माहिती निर्भया पथकातील प्रमुख हवालदार अमृता भोईटे यांनी दिली.
इंदापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसदेव, पळसनाथ महाविद्यालय व जुनिअर कॉलेज पळसदेव, एल जी बनसोडे सेमी इंग्लिश व इंग्लिश मीडियम- जुनियर कॉलेज पळसदेव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरा-नरसिंहपुर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडोबा-वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी बुद्रुक, या शाळांमध्ये जाऊन "निर्भया" पथकाने विविध विषयांवर ती माहिती देत. तसेच डायल ११२ या आपत्कालीन प्रतीसाद देणार्या क्रमांकावरती संपर्क साधल्यास मिळणारी तातडीची मदत याविषयी माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना अमृता भोईटे म्हणाल्या की महिलांची छेडछाड हा माहिलांवरील अत्याचारातील अगदी पहिला टप्पा आहे. फोन कॉल, मेसेज, ई-मेल, सोशल मीडियाचा वापर करुन किंवा प्रत्यक्षरित्या महिलेची छेड काढली जाते, अशा वेळी महिलांना विनाविलंब पोलिसांची मदत उपलब्ध करून देऊन तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, महिला/ शाळकरी मुलींच्या छेडछाडीकडे होणारे दुर्लक्ष व त्यातून अपराध्यांचे वाढणारे बळ यांवर प्रभावी नियंत्रण आणणे, पुरुषांना विशेषत: तरुणांना त्यांच्या गैरवर्तनाची समुपदेशनातून जाणीव करून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने त्यांना सुधारण्याची संधी देण्याच्या उद्देशाने निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.
पोलीस हवालदार अमृता भोईटे पुढे म्हणाल्या की या पथकाच्या माध्यमातून पहिल्यांदा महिला अथवा तरुणींची छेडछाड होण्याची शक्यता असणारी ठिकाणे शोधून काढण्यात येतात. त्यामध्ये शाळा, महाविद्यालये, बस स्थानक, बाजारपेठा, महिला वसतीगृहे, सिनेमा हॉल, उद्याने इत्यादीचा समावेश असतो. निर्भया पथक अशा ठिकाणांची टेहाळणी करुन उडाणटप्पू मुले, तरुण, पुरुषांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई करत आहे असे पोलीस हवालदार अमृता भोईटे म्हणाल्या.
सदरचे पथक पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागीय पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, व बारामती उपविभाग कार्यक्षेत्रात येत असलेल्या सर्व पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक बारामती आणि इंदापूर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
चौकट:-
शिक्षण घेत असलेल्या मुलींसहित,महिला व तरुणींना त्यांच्या सुरक्षितता व कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करुन देऊन. पुरुषांना त्यांचे कृत्य अपराध असल्याबाबत व त्याचे परिणाम, शिक्षा याचे मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोनातून समाजात निर्भया पथकामार्फत प्रबोधनात्मक शिबीरे आयोजित केली जात आहेत. यासाठी मार्गदर्शन शिबीरे, पोस्टर्स, वेब साईट, रेडियोवरील महिलांविषयक/ तरुणांचे कार्यक्रम, स्टीकर्स, शॉर्ट फिल्म्स, थिएटर मध्ये सिनेमा मध्यंतरावेळी जाहिरातीद्वारे प्रबोधन केले जात आहे अशी माहिती पोलीस हवालदार अमृता भोईटे यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन देत पोलिसांनी विषयी आदरतिथ्य व आपुलकी शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींमध्ये वाढवण्याचे प्रमुख काम केले आहे.